गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाट्यकलेविषयीचा ओढा, नियमांचे काटेकोर पालन अन् शिस्त भावली!!
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतिम फेरी पाहिल्यानंतर आंध्र प्रदेशातील नाट्यअभ्यासक प्रभावित!
पुणे : महाविद्यालयीन जीवनापासून नाट्यकलेचा ओढा, व्यावसायिकच नव्हे तर स्पर्धेतील एकांकिका तिकिट काढून बघण्याचे लहान-थोरांमध्ये रुजलेल बीज, स्पर्धेच्या आयोजनात सुसूत्रता आणि निटनेटकेपणा, स्पर्धक संघांकडून घड्याळाच्या काट्यावर सुरू असलेली लगबग.
या गोष्टी विशेषत्वाने भावल्याचे प्रांजळ मत आंध्रप्रदेशातून आलेल्या नाट्यअभ्यासकांनी व्यक्त केले. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पाहण्यासाठी हे अभ्यासक पुण्यात आले होते. डिसेंबरमध्ये होत असलेला स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पाहण्यासाठी निश्चित येणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
स्पर्धेची अंतिम फेरी भरत नाट्य मंदिरात शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात आली होती. अंतिम फेरीतील एकांकिका पाहण्यासाठी आंध्र प्रदेशातून आले होते व्ही. व्ही. एल. श्रीनिवास आणि एस. पी. आदिनारायण. एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी त्यांना निमंत्रित केले होते ते मूळचे आंध्र प्रदेशातील पण 40वर्षांहून अधिक काळ पुण्यात (निगडी) वास्तव्यास असलेल्या ए. एल. मूर्ती यांनी.
श्रीनिवास हे नाट्य शास्त्राचे प्राध्यापक आहेत. नाट्य शास्त्राचे अभ्यासक या नात्याने ते पाँडेचेरी, भुवनेश्वर, अमृतसर आणि दिल्ली येथे कार्यरत होते. पथनाट्य या क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ते देशाती विविधविद्यापीठांमधील नाट्यशास्त्र विभागात परीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. आदिनारायण हे तेलगू रंगभूमीवरील कलावंत असून लेखकही आहेत.
40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते रंगभूमीशी जोडले गेलेले आहेत
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेविषयी बोलताना श्रीनिवास म्हणाले, स्पर्धेतील युवा वर्गाचा उत्साह बघून पुरुषोत्तम करंडक स्पर्धेप्रमाणेच आंध्रप्रदेशात स्पर्धा सुरू करण्याचा विचार मनात आला आहे. स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त, वेळेचे काटेकोर नियोजन या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.
आंध्रातील छोट्या-छोट्या शहरात नाटक सादर केले जाते; पण तरुणांचा ओढा असतो तो चित्रपट सृष्टीकडे, कारण पैसा हेच युवा वर्गाचे आकर्षण आहे. पण महाराष्ट्राच्या तुलनेत आंध्रप्रदेशात नाट्यचळवळ तशी कमीच आहे. या स्पर्धेमुळे युवा वर्गाला शिस्तीचे महत्त्व कळते आहे. या स्पर्धेतून एक नवी उर्जा घेऊन परतलो आहे. महाराष्ट्राच्या विशेषत: पुण्यातील नाट्य चळवळीसारखी चळवळ आंध्र प्रदेशात रुजावी यासाठी प्रयत्न सुरू करणार आहे.
आदिनारायण म्हणाले, स्पर्धेच्या माध्यमातून नाटकाची परंपरा सुरू ठेवली जात आहे ही चांगली गोष्ट आहे. व्यावसायि नाटकाप्रमाणेच स्पर्धेतील नाटकालाही तिकिट काढून प्रेक्षक वेळेवर येतात ही बाब विशेषत्वाने भावली. आम्हाला नाटक सादर करताना तांत्रिक बाबींची जुळवाजुळव करण्यासाठी खूप अडचणी येतात पण या स्पर्धेत तांत्रिक बाजू विद्यार्थीच सहजतेनेच हाताळताना दिसले. ‘पुरुषोत्तम’सारखी स्पर्धा आमच्याकडे होत नाही. स्पर्धेसाठीचे नियम कसे असतात हे याच स्पर्धेमुळे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.
स्पर्धेसाठीचा निर्धारित वेळ योग्य नियोजन आणि समन्वयातून कसा साधला जातो ही बाब खूपच अचंबित करणारी आहे. चित्रपट, दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांच्या झगमगत्या जगात नाटक टिकवून ठेवणाऱ्या युवा पिढीला कोटी कोटी प्रणाम.
जाहिरात