गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित भीमसेन जोशी, पंडित शिवकुमार शर्मा स्मृती सांगीतिक मैफलीचे शनिवारी आयोजन !!
विराज जोशी यांचे गायन तर कुणाल गुंजाळ यांचे संतूर वादन !
पुणे : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी शनिवारी गायन आणि वादनाच्या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मैफल शनिवार, दि. 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सदाशिव पेठेतील एमईएस भावे प्राथमिक शाळा ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आली आहे.
मैफलीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू, युवा पिढीतील आश्वासक गायक विराज जोशी यांचे गायन तर पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य कुणाल गुंजाळ यांचे संतूर वादन होणार आहे. कलाकारांना रोहित मुजुमदार (तबला), अमेय बिचू (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
विराज जोशी हे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्रीनिवास जोशी यांचे चिरंजीव आहेत. विराज हे पंडित भीमसेन जोशी यांचा किराणा घराण्याचा वारसा पुढे नेत असून त्यांनी सुधाकर चव्हाण यांचे मार्गदर्शन घेतले आहे.
सध्या त्यांच्या गायनाची तालिम वडिल श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विराज यांनी वयाच्या सहाव्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात वडिलांना गायन साथ केली आहे. देश-विदेशात त्यांनी गायनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. डॉ. एम. एस. सुब्बुलक्ष्मी फेलोशिप विराज यांना प्रदान करण्यात आली आहे. तसेच रोटरी क्लबकडून युवा प्रतिभा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कुणाल गुंजाळ हे संतूरवादक आणि संगीतकार असून त्यांचे संतूर वादनाचे प्राथमिक शिक्षण पंडित शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ. धनंजय दैठणकर यांच्याकडे झाले. त्यानंतर गुंजाळ यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पंडित शर्मा यांच्यासह गुंजाळ यांनी अनेक मैफलीत सहवादन केले. कुणाल हे केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे तसेच सवाई गंधर्व शिष्यवृत्तीचे मानकरी आहेत.
देश-विदेशातील अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेल्या कुणाल गुंजाळ यांनी ‘नेचर ऑफ ऑल थिंग्स’ नावाने अल्बम तयार केला असून पश्चिमी चित्रपटांमध्ये पार्श्वसंगीतासाठी संतूर वादन केले आहे. तसेच कुणाल गुंजाळ हे ग्रॅमी पुरस्कार आयोजित करत असलेल्या रेकॉर्डिंग अकादमीचे मानद सदस्य आहेत.