गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विनोदबुद्धी राहिली नसल्याने सध्या व्यंगात्मक विनोदच शक्य!
श्रावण हर्डीकर यांचे प्रतिपादन : डॉ. रवींद्र तांबोळी लिखित ‘फुकटचेच सल्ले’ पुस्तकाचे प्रकाशन!!
पुणे : विनोद करण्याचे सध्या युग राहिलेले नाही. विनोद शेवटची घटका मोजत आहे असेही बोलले जात आहे. या परिस्थितीला सर्वच घटक जबाबदार आहेत. विनोदाचा आनंद घेण्याआधी तो पचविण्याची क्षमता समाजामध्ये निर्माण व्हावी लागते. विनोदवृत्ती राजकीय होते त्यावेळी राजकीय दृष्टीकोनातून दबाव यायला सुरुवात होते. स्वत:कडे विनोदबुद्धीने पाहण्याची क्षमता शिल्लक राहिलेली नसल्याने सध्या केवळ व्यंगात्मक विनोद करणेच शक्य आहे,
अशी वास्तव परिस्थिती नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांनी परखड शब्दात मांडली.
डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी लिखित ‘फुकटचेच सल्ले’ या पुस्तकाचे प्रकाशन हर्डीकर यांच्या हस्ते आज (दि. 26) झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, समीक्षक प्रा. रणधीर शिंदे, मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर व्यासपीठावर होते. कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
फुकटचेच सल्ले’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (डावीकडून) डॉ. रवींद्र तांबोळी, प्रा. रणधीर शिंदे, श्रावण हर्डीकर, प्रा. मिलिंद जोशी, अरविंद पाटकर.
हर्डीकर पुढे म्हणाले, विनोद हा कोणा एकावर नसून तो आपल्यातील आत्मवृत्तीवर असतो. विनोदवृत्ती प्रत्येकामध्ये दडलेली असते. खुमासदार विनोदशैली आपल्याला जर जपायची असेल तर आपल्यासारख्या वाचकाला आत्मावलोकन करीत विनोद स्वीकारणे तसेच वृत्तीत खुलेपणा आणणे फार आवश्यक आहे. डॉ. तांबोळी यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक आनंददायी क्षण अनुभवायला मिळत असल्याचे हर्डीकर यांनी आवर्जून नमूद केले.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विनोद या प्रकाराकडे कधी गांभीर्याने न बघितल्याने त्याची अपरिमित हानी झाली आहे. अर्थ, धर्म, कामशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ आहेत पण हास्यशास्त्रावरचा एकही ग्रंथ आपल्याकडे नाही.
नदीसारखा विनोदाचा प्रवाह आपल्याकडे नाही. आपल्याकडे शांतरस आहे, करूण, वीररस आहे; पण हास्यरसाचा मात्र अभाव दिसतो. मराठीतील विनोद आज अतिदक्षता विभागात आहे ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागणार आहे. आजचा काळ विनोदी लेखनासाठी पूरक आहे. गेल्या शंभर वर्षांत जेवढी स्थित्यंतरे झाली नाहीत तेवढी गेल्या दहा वर्षांत झाली आहेत. जगणे आपल्यावर कोसळत आहे. अशा परिस्थितीमध्ये विनोदी लेखनासाठी खूप मोठी संधी आहे. पण समाजाची एकूण मानसिकता बघता विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण मानावे लागेल.
आभासी जगात श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली असताना डॉ. तांबोळी यांनी विविध कथांची मांडणी उत्तम प्रकारे केली असल्याचे प्रा. जोशी यांनी नमूद केले.
प्रा. रणधीर शिंदे म्हणाले, विनोद या साहित्य प्रकाराकडे मूल्यांच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. मात्र विनोदाकडे विडंबन या दृष्टीकोनातून पाहिले गेले. तांबोळी यांनी आपल्या लिखाणातून समाजातील अनेक बारकावे मांडले आहेत.
तांबोळी यांच्या पुस्तकातील विविध कथांचा आधार घेऊन त्यांच्या नर्मविनोदी लेखन शैलीवर मार्मिक भाषेत प्रा. शिंदे यांनी टिप्पणी केली.सुरुवातीस डॉ. तांबोळी यांनी गोतावळ्यातून लेखन प्रवास कसा झाला हे सांगितले. प्रास्ताविक अरविंद पाटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत अरविंद पाटकर आणि भूषण कदम यांनी केले.
चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. पुस्तकातील ‘वाढलेल्या पोटाची काळजी’ या लेखातील काही भागाचे वाचन पत्रकार विशाल परदेशी यांनी केले.
जाहिरात