गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कनि महिला मंचतर्फे कर्तृत्ववान महिला-युवतींचा सन्मान !
पुणे : कनि महिला मंचतर्फे कर्तृत्ववान महिला-युवतींचा सन्मान आणि मंचच्या सदस्यांसाठी लावणीचा कार्यक्रम असा एक आगळावेगळा सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंचात रंगला.
‘कनि’ म्हणजे स्त्री शक्तीचा अस्तित्वाचा अखंड गजर..प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या दिसण्यामध्ये नसून तिच्या कलागुणांमध्ये आणि तिच्या स्वभावात असते या विचारधारेतून मंच कार्यरत असून मंचच्या संस्थापिका आहेत कल्याणी उल्हास कदम.
मंचच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. क्रांतीदिनाच्या निमित्ताने या अनोख्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
डाऊन सिंड्रोमने पिडित असूनही विशेष मुलांना नृत्य आणि योगासनांचे धडे देणाऱ्या सायली आगवणे, श्रवणकेंद्रे पूर्णपणे निकामी झालेली असूनही खचून न जाता कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तसेच शास्त्रीय नृत्यात पारंगत प्रेरणा सहाणे, मतिमंदत्वावर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या गौरी गाडगीळ.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण विभागामार्फत पूर्वांचलमध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या पुणे केंद्र प्रमुख संपदा खोले, सहप्रमुख सुचेता शिर्के यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आमदार माधुरी मिसाळ, आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह कल्याणी कदम, उल्हास कदम, प्रतिभा धंगेकर, प्रिया गदादे, शिवाजी गदादे, मंदार जोशी, शुभांगी शेरेकर.सागर दोलताडे, आम्रपाली गायकवाड, राजेंद्र बलकवडे, मनोज पाटील, वैभव पाटसकर किरण सावंत बाळासाहेब दाभेकर अंकुश काकडे जतीन पांडे, बिग बॉस फेम अक्षय केळकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचा सन्मान कल्याणी कदम व उल्हास कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
कनि महिला मंच आयोजित सत्कार सोहळ्यात मान्यवरांसह सत्कारार्थी.
स्त्री-शक्ती हे परमेश्वराने दिलेले वरदान आहे. या स्त्रीशक्तीची ओळख करून देण्यासाठी कनि महिला मंचतर्फे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा यथोचित गौरव केला जातो, अशी माहिती मंचच्या संस्थापिका कल्याणी कदम यांनी प्रास्ताविकात दिली.
सत्कार सोहळ्यानंतर मंचच्या सभासदांसाठी सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिक्षणासाठी पूर्वांचलातून महाराष्ट्रात शिक्षणासाठी आलेल्या मुलींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. लावणी नृत्यप्रकार पहिल्यांदाच पाहत असून खूप आवडल्याचे मायसिलीन या विद्यार्थिनीने सांगितले.
जाहिरात