गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सरकारी यंत्रणेत निर्माण झाली आहे ‘देव’ असल्याची भावना : रवींद्र शिंगणापूरकर
कृषी दिनानिमित्त वृंदावन कृषिभूषण पुरस्कारांचे वितरण !
पुणे : सरकारी यंत्रणेची मदत घेतल्यास निर्णय क्षमतेवर मर्यादायेतात. वास्तविक सरकारी कर्मचारी, लोकनियुक्त प्रतिनिधी हे समाजाची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेले असतात; मात्र अधिकारप्राप्तीनंतर सर्वसामान्य लोकांचे आपण ‘देव’ झालो आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी केली. अशा प्रवृत्तीविरोधात फळी निर्माण करावी लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कृषी दिनाचे औचित्य साधून वृंदावन फाउंडेशन, राजमुद्रा संशोधन आणि विकास केंद्रातर्फे कृषी, जलसंधारण, गोपालन, पर्यावरण, पशुधन या क्षेत्रात कार्यरत प्रयोगशील शेतकऱ्यांचा शिंगणापूरकर यांच्या हस्ते वृंदावन कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज, ज्येष्ठ पर्यावरणवादी ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर अध्यक्षस्थानी होते. शाल, सन्मानपत्र, संत चोखामेळा गाथा असे पुरस्काराचे स्वरूप होते. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, कार्यक्रमाचे निमंत्रक सचिन पाटील, प्रा. डॉ. माणिकराव सोनवणे व्यासपीठावर होते. सुनील उटगे (औसा), प्रा. संतोष तौर (येरमाळा), केशव होले (पाटस), प्रदीप बालकुंदे (उमरगा), सुमित नवले (बार्शी), योगेश धरम (देहूगाव), नितीन काकडे (बोधेगाव) आणि वारी परिवार (मंगळवेढा) यांचा वृंदावन कृषिभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
निसर्गाचे सकारात्मक तत्त्व सांभाळणे आवश्यक असल्याचे सांगून रवींद्र शिंगणापूरकर पुढे म्हणाले, शोभेच्या झाडांचे रोपण टाळून देशी झाडांचे रोपण करणे आवश्यक आहे. असे केले तरच निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत होईल.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज म्हणाले, समाजसेवेबरोबरच गोपालन करणे आवश्यक आहे. गीर गाईसंदर्भात परदेशात ज्या प्रमाणे संशोधन झाले आहे त्याच प्रमाणे आपल्या देशात संशोधन होणे आवश्यक आहे.
सुरुवातीस सचिन पाटील यांनी वृंदावन फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती देत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांचे स्वागत प्रा. डॉ. माणिक सोनवणे, दीपक चांदणे, फुलचंद नागटिळक यांनी केले.
फोटो ओळ : वृंदावन फाउंडेशन, राजमुद्रा संशोधन आणि विकास केंद्र आयोजित वृंदावन कृषिभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारार्थींसमवेत सचिन पाटील, ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज, रवींद्र शिंगणापूरकर, ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज.
जाहिरात