गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कारांची घोषणा !!
डॉ. संजय ढोले, फारुक काझी व चंद्रमोहन कुलकर्णी पुरस्काराचे मानकरी !!
‘राफिणू’, ‘जादूई दरवाजे’ व ‘कुमार स्वर एक गंधर्व कथा’ बाल-कुमार पुस्तकांची निवड !
पुणे : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉ. संजय ढोले, फारुक काझी व चंद्रमोहन कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष असून 2023 साली प्रसिद्ध झालेल्या डॉ. संजय ढोले यांच्या ‘राफिणू’ या किशोर-कुमारवयीन गटासाठी लिहिलेल्या कादंबरीला रुपये पाच हजार, फारुक काझी यांच्या ‘जादूई दरवाजे’ या बाल साहित्यास रुपये तीन हजार तर माधुरी पुरंदरे लिखित ‘कुमार स्वर एक गंधर्व कथा’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच पुस्तकातील चित्रांसाठी चंद्रमोहन कुलकर्णी यांना दोन हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
रोख रक्कम व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार, दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष व संपादक डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी., पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे व व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश वसंत गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई अत्रे या बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2023 पासून मराठीतील बालसाहित्यकाराला पुरस्कृत करण्याचा मानस डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केला. त्यासाठी दरवर्षी प्रकाशित उत्तम बालसाहित्यकृती साकारणाऱ्या लेखकांना पुरस्कार देण्यात येतात. कार्यक्रमाचे संयोजन ठाणे येथील प्रकाशन संस्था व्यास क्रिएशन्स व दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी करणार आहे.
श्रीमती इंदिराबाई या एक शिक्षिका म्हणूनच नाही तर बालसाहित्यकार म्हणूनही ओळखल्या जात. त्यांनी आपल्या लेखनातून मुलांना संकारक्षमता व गुणग्राहकताही शिकविली. आजच्या काळातील अशाच एखाद्या कळकळीच्या बालसाहित्यिकारांचा सन्मान व्हावा, हा या पुरस्काराचा उद्देश असल्याचे दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी सांगितले.
__________________________________________
जाहिरात