गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गुरुवर्य पंडित भाई गायतोंडे स्मृतिदिनानिमित्त गुरुअभिवादन !!
डॉ. अनिश प्रधान, सुनील जायफळकर यांचे एकल तबलावादनतबलावादन मैफल रसिकांसाठी ठरली पर्वणी !!
पुणे : गुरुवर्य स्व. पंडित भाई गायतोंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकल तबलावादनाची मैफल रंगली. पंडित गायातोंडे यांचे शिष्य सुनील जायफळकर यांचे कार्यक्रमाच्या पूर्वार्धात तर निमंत्रित कलाकार जगप्रसिद्ध तबलावादक डॉ. अनिश प्रधान यांचे उत्तरार्धात तबलावादन झाले. उत्तरोत्तर रंगत गेलेले वादन रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.
एकल तबलावादन करताना डॉ. अनिश प्रधान आणि श्रीराम हसबनीस.
गुरुवर्य स्व. पंडित भाई गायतोंडे यांच्या तबलावादक शिष्या संजीवनी हसबनीस आणि संवादिनी वादक श्रीराम हसबनीस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम एस. एम. जोशी सभागृहात झाला. सुरुवातीस दीप प्रज्वलन आणि पंडित भाई गायतोंडे यांच्या प्रतिमेचे पूजन पंडित गायतोंडे यांचे पुत्र, प्रसिद्ध हार्मोनियम वादक डॉ. दिलीप गायतोंडे, डॉ. अनिश प्रधान, सुनील जायफळकर, श्रीराम हसबनीस, संजीवनी हसबनीस यांच्या हस्ते झाले.
मैफलीची सुरुवात सुनील जायफळकर यांच्या एकल तबला वादनाने झाली. त्यांना स्मिता मनोहर यांनी नगमा साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. अनिश प्रधान यांचे एकल तबला वादन झाले. डॉ. प्रधान यांनी सुरुवातीला पेशकार त्यानंतर दिल्ली, अजराडा घराण्याचे पारंपरिक कायदे, रेले सादर केले. उस्ताद आमिर हुसैन खाँसाहेब रचित रेला आणि काही पारंपरिक रचनाही ऐकविल्या. यानंतर डॉ. प्रधान यांनी स्वरचित गत व तुकडे सादर करून रसिकांना मोहित केले.
एकल तबलावादन करताना सुनील जायफळकर आणि स्मिता मनोहर.
डॉ. अनिश प्रधान यांनी रचलेल्या कल्पकता आणि कलेवरील प्रेमाचा नमुना दर्शविणाऱ्या रचना सादर करून त्यांचे वादनामागील सखोल विचार प्रदर्शित केले. त्यानंतर ‘नज्मनुमा’ हा काव्यप्रकार सादर केला.
ही स्वरचित बंदिश रचताना त्यांना मिळालेली प्रेरणा, काव्यात्मक पद्धतीने केलेली बोलांची निवड आणि कोणत्याच पारंपरिक बंदिशप्रकारात न मोडणारी परंतु बंदिशीचे स्वरूप असणारी रचना व त्या रचनेचे पत्नी विदुषी शुभा मुद्गल यांनी ‘नज्मनुमा’ हे केलेले नामकरण याचे किस्से सांगितले. डॉ. प्रधान यांनी मैफलीची सांगता लग्गी या त्यांच्या हातखंडा असलेल्या तबला वादन प्रकाराने केली. उत्तम तयारी, अलवार, नाजूक व बारीक काम असलेली लग्गी ऐकून रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
डॉ. प्रधान यांना सारंगीवर श्रीराम हसबनीस यांनी सुमधुर, समर्पक नगमा साथ केली. 20 वर्षांपूर्वी पंडित गायतोंडे यांना दोन वेळा सारंगीवर नगमा साथ केल्याची आठवण सांगून पंडित गायतोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमात सारंगीवर नगमासाथ करण्याची संधी मिळाल्याचे श्रीराम हसबनीस यांनी आवर्जून सांगितले.
डॉ. दिलीप गायतोंडे यांचा सत्कार श्रीराम हसबनीस यांनी केला तर कलाकारांचा सत्कार ज्येष्ठ तबलावादक माधव मोडक आणि डॉ. दिलीप गायतोंडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
जाहिरात