गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘कहत गुनिजान’मधून उलगडला पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक विचार !!
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत कार्यक्रमात अपर्णा केळकर, डॉ. चैतन्य कुंटे यांचा सहभाग !!
पुणे : पंडित सी. आर. व्यास यांच्या सांगीतिक विचारांची आणि त्यांनी रचलेल्या अर्थपूर्ण बंदिशिंची सप्रयोग चर्चा करणारा असा विशेष कार्यक्रम प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आणि प्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. चैतन्य कुंटे यांनी सादर केला.
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत ‘कहत गुनिजान’ ही सांगीतिक मैफल श्रीराम लागू रंग-अवकाश येथे आयोजित करण्यात आली होती. पंडित सी. आर. व्यास यांच्या स्वरचित बंदिशींमधील साहित्य व सांगीतिक विचार या मैफलीतून मांडला गेला.अपर्णा केळकर यांनी राग धनकोनी कल्याण रागातील ‘सरस सुर गाऊँ…’ या बंदिशीच्या गायनातून रागभाव आणि काव्यभावाची सुंदर पेशकश केली. नित लगो ध्यान (रागेश्री), दरबार सुना तुमबिन (सगेरा), सुरज चंदा जबतक फिरे (नटभैरव), चतुर तुम हो प्राण पिया (स्वानंदी), तू है रंगीला (मालव), नित रहे मगन (शिवअभोगी), हो सुरन में रस तुम (ललित), हो न कर छोडूं (जोगिया) या बंदिशींतून पं. व्यास यांची गुरुभक्ति प्रकट झाली. सोही रिझाए (शुद्धकल्याण), मितवा कित (कैशिकरंजनी) आणि पूरियाधनाश्री रागातील तराना अशा प्रासंगिक बंदिशींच्या मागचे रोचक विचार डॉ. कुंटे यांनी विवेचनातून स्पष्ट केले.
‘कहत गुनिजान’ कार्यक्रमात कौशिक केळकर, अपर्णा केळकर, डॉ. चैतन्य कुंटे.
कोमल ऋषभ आसावरी, कीरवाणी या रागात देवताविषयक बंदिशी पेश झाल्या, तर मोरे नैनवा तरस रहे (मारुबिहाग), तोहे आन मोरी (मधुवंती) ह्या बंदिशींतून शृंगाराचे रंग दिसले. मैफलीचा समारोप अपर्णा केळकर यांनी आध्यात्मिक आशयाच्या सांझ की बेर सुमिर हरिनाम (श्री) आणि तज रे अभिमान (बिलासखानी तोडी) या भावगर्भ बंदिशींच्या प्रभावी गायनाने केला. डॉ. चैतन्य कुंटे यांच्या निरुपणातून ह्या बंदिशींतील सौंदर्यस्थळे रसिकांना उलगडत गेली. कौशिक केळकर यांनी समर्कप तबलासाथ केली.
व्यासबुवा यांच्या ज्येष्ठ शिष्या निर्मलाताई गोगटे, रमाकांत परांजपे, शुभदाताई मोघे, अजय पराड, प्रा. प्रकाश भोंडे, अरुंधतीताई महांबरे यांच्यासह अनेक मान्यवरांना मैफलीचा आनंद घेतला.
कार्यक्रमाविषयी माहिती देत संजय गोखले यांनी कलाकारांचा परिचय करून दिला. स्वानंदी क्रिएशनतर्फे मकरंद केळकर यांनी या मैफलीचे आयोजन केले होते.
———————-–––———————————–
जाहिरात