गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘विंग्ज अन्व्हेल्ड’ पक्षी छायाचित्रकारांसाठी वस्तुपाठ : जैनी मारिया !!
पुणे : ‘विंग्ज अन्व्हेल्ड’ हे पुस्तक सर्व दृष्टीने परिपूर्ण झाले आहे. निसर्गातील वैविध्यपूर्ण पक्ष्यांचे छायाचित्रण करताना उपयुक्त ठरणारी तांत्रिक माहिती अतियश कलात्मकतेने छायाचित्रकारांच्या हाती दिली असून हे पुस्तक म्हणजे एक वस्तुपाठ आहे. पुस्तकाची मांडणी साध्या, सरळ, सोप्या भाषेत केलेली असून निसर्ग संवर्धनाचा संदेशही या पुस्तकात देण्यात आला आहे, असे प्रतिपादन जगविख्यात पक्षी छायाचित्रकार जैनी मारिया यांनी केले.
निसर्गातील वैविध्यपूर्ण पक्ष्यांच्या छायाचित्रणाविषयी सखोल माहिती देणाऱ्या आणि आकर्षक छायाचित्रे असणाऱ्या ‘विंग्ज अन्व्हेल्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन जैनी मारिया व प्राईम्स ॲन्ड झूम्सचे संस्थापक, सीईओ अभिजित मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी जैनी बौलत होत्या. सुमंत मुळगांवकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुधीर हसमनीस, डॉ. पूनम शहा, नेहा फडके, गायत्री हसबनीस-पिंपळे, पल्लवी शिवलकर आणि आनंद विकामशी या हौशी छायाचित्रकारांनी पुस्तकाचे लेखन केले आहे.
निसर्गातील वैविध्यपूर्ण पक्ष्यांच्या छायाचित्रणाविषयी सखोल माहिती देणाऱ्या ‘विंग्ज अन्व्हेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
पुस्तक लेखनाविषयी सर्व लेखकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सुधीर हसमनीस म्हणाले, पक्षी छायाचित्रण करणाऱ्या अनुभवी छायाचित्रकरांचे ज्ञान, त्यांनी संकलित केलेली माहिती जास्तीत जास्त छायाचित्रकारांपर्यंत पोहोचण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. उत्तम निर्मितीच्या ध्यासातून हे पुस्तक साकारले आहे. माहितीपूर्ण तांत्रिक बाबींचा या पुस्तकात समावेश आहे. जागतिक स्तरावरही हे पुस्तक नक्कीच आघाडीवर असेल. तांत्रिक विषयात माहिती आणि आकर्षक मांडणी यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरेल.
जैनी म्हणाल्या, पक्षी छायाचित्रणाच्या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक छायाचित्रकारासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. या पुस्तकाद्वारे सर्व लेखकांनी पक्षी छायाचित्रण क्षेत्रात आलेले अनेक दशकांचे अनुभव अतिशय सोप्या शब्दांत वाचकांसमोर मांडले आहेत. देश-विदेशात कॅमेऱ्यात बंदिस्त केलेल्या पक्ष्यांची माहिती देत छायाचित्रणात आलेले अनुभवही त्यांनी कथन केले.
छायाचित्रण ही ध्यानमग्न होण्याची प्रक्रिया : अभिजित मुथा
सर्व लेखकांचे अभिनंदन करून अभिजित मुथा म्हणाले, पक्षी छायाचित्रकार स्वआनंदासाठी छायाचित्रण करतात. तसेच समाजमाध्यमांद्वारे व्यक्त होताना दिसतात. परंतु अनेक छायाचित्रकार घडविण्यासाठी सर्व लेखकांनी आपले अनुभव, माहिती, संकलन पुस्तक रुपाने वाचकांसमोर आणले आहे. फक्त छायाचित्रण न करता या क्षेत्रातील तांत्रिक माहिती, अनेक बारकावे हौशी छायाचित्रकार घडण्यासाठी अभ्यासपूर्ण ठरणार आहे.
या पुस्तकाद्वारे छायाचित्रण करताना योग्य चौकट निवडणे, नियोजन करणे तसेच त्यातून अपेक्षित छायाचित्र गवसणे हे शक्य होऊ शकते. छायाचित्रण ही ध्यानमग्न होण्याची प्रक्रिया असते. कॅमेरा खरेदी करण्यापूर्वी या पुस्तकाचा अभ्यास करावा. निसर्गाच्या अंतरंगात जाण्यासाठी छायाचित्रणाचा छंद जोपासल्यास आत्मिक आनंद मिळेल.
जाहिरात