गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हसत-खेळत बच्चे कंपनीने अनुभवले विज्ञान
विज्ञानामागील विज्ञान समजून घेत मुलांचे विज्ञानविश्व झाले समृद्ध !!
‘भावार्थ’, संवाद आयोजित बालसाहित्य महोत्सवात रंगला विज्ञान गप्पागपी कार्यक्रम !!
पुणे : बच्चे कंपनीला हसवत खेळवत विज्ञानाची ओळख करून देत विज्ञानाविषयीचे औत्सुक्य वाढवत, विज्ञान समजून घेत रंगला विज्ञान गप्पागप्पीचा प्रयोग. निमित्त होते ‘भावार्थ’ आणि संवाद पुणे आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवाचे.‘भावार्थ साहित्य दालन’, सक्सेस स्क्वेअर, कर्वेपुतळ्याजवळ, कोथरूड येथे गेल्या दिवसापासून हा महोत्सव सुरू आहे. शनिवारी (दि. 20) शालेय विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भावार्थ’ आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवात विज्ञान गप्पागप्पी कार्यक्रमात मुलांना विज्ञानातील प्रयोगांची माहिती देताना विनय र. र. आणि राजीव तांबे.
कधी मुलांच्या कल्पनाशक्तीला उत्तेजना तर कधी ढगांची-पावसाची गम्मत तर कधी स्वयंपाकघरातील विज्ञानाची ओळख करून देत, एकाच कृतीचे दोन परिणाम, स्पर्शज्ञान, दृष्टीभ्रम असे प्रयोग दाखवत बालसाहित्यकार राजीव तांबे आणि मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष विनय र. र. यांनी मुलांसह त्यांच्या पालकांनाही खिळवून ठेवले. भावार्थचे सल्लागार प्रसाद मिरासदार, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार उपस्थित होते.
सुरुवातीस राजीव तांबे यांनी मुलांना क्रियापदे शिकविण्याची युक्ती सांगितली. काळ्या ढगातून पांढरा पाऊस कसा पडतो? तेल गरम झाले का पाहण्यासाठी तेलात मोहरीच का घातली जाते? जिरे हातावर चोळल्यावर त्याचा वास का दरवळतो? कपाटाला की-होल हॅन्डलच्या खालीच का असते? अशा विषयांवर राजीव तांबे यांनी मुलांना बोलते करत त्यांचे कल्पनाविश्व समृद्ध केले.
ज्ञानमुद्रेचे फायदे काय? पंचेंद्रियांच्या माध्यमातून काय साधले जाते? बर्फ पाण्यात तरंगतो का बुडतो? प्रकाश दिसण्यामागे काय विज्ञान आहे? या विषयांवर विनय र. र. यांनी मुलांच्या कल्पना समजून घेत लहान-लहान विज्ञान प्रयोगही दाखविले. आपल्याला पडलेल्या प्रश्नाच्या मागे लागून खरे विज्ञान जाणून घ्यावे, त्या विषयी मनात कायम औत्सुक्य असावे असे मार्गदर्शन त्यांनी मुलांना केले.
राजीव तांबे आणि विनय र. र. यांच्या प्रश्नांना मुलांनी त्यांच्या कल्पानाशक्तीला वाव देत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि कधीकधी वेगवेगळी मजेशीर उत्तरेही दिली. विज्ञानासंदर्भातील प्रश्नोतरांमध्ये पालकांनाही सामावून घेत गप्पागप्पी कार्यक्रम खुलवत नेला.
मान्यवरांचे स्वागत भावार्थचे सल्लागार प्रसाद मिरासदार यांनी केले. प्रास्ताविक भावार्थच्या व्यवस्थापक कीर्ती जोशी यांनी केले.
जाहिरात