गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुशील ओक, परिणीता मराठे यांना स्वानंदी क्रिएशनचा ‘तपस्या पुरस्कार’.!!
मंगळवारी होणार गौरव : पल्लवी पोटे, भाग्यश्री केसकर यांच्या गायन मैफलीचे आयोजन !!
पुणे : स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रत्यक्ष आचारणात आणून समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या पंडित राम मराठे यांच्या कन्या सेवाव्रती श्रीमती सुशील रघुवीर ओक आणि आईकडून मिळालेला सांगीतिक वारसा जपणाऱ्या श्रीमती परिणीता प्रमोद मराठे यांचा स्वानंदी क्रिएशनतर्फे ‘तपस्या पुरस्कार’ देऊन गौरव केला जाणार आहे.
कला, साहित्य आणि सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या तसेच कला-साहित्य-सामाजिक कार्यात लक्षणीय कर्तृत्व गाजविणाऱ्या प्रसिद्धी पराङ्मुख स्त्रीशक्तीला महिला दिनानिमित्त स्वानंदी क्रिएशन पुणेतर्फे ‘तपस्या पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. 19 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल आवार, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती स्वानंदी क्रिएशनच्या संस्थापक, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आणि उद्योजक मकरंद केळकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्काराचे वितरण संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्काराच्या मानकरी ओक आणि मराठे यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी आशिष केसकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पल्लवी पोटे आणि भाग्यश्री केसकर यांचे गायन होणार आहे. पंडित प्रमोद मराठे (संवादिनी), कौशिक केळकर (तबला) साथसंगत करणार असून डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे निवेदन असणार आहे.
वडिलांकडून मिळालेला संगीताचा वारसा मुलीकडे सोपवून सुशील ओक या वंचित जीवन जगणाऱ्या समाजासाठी अहोरात्र कार्य करत आहेत. पूर्वाश्रमीच्या मंगल राम मराठे यांच्यावर संगीताचे जसे संस्कार झाले त्याचप्रमाणे गरजवंतांना मदतीचा हात देण्याचेही संस्कार वडिलांकडून झाले. पंडित मराठे यांनी अनेक कार्यक्रम संगीताची सेवा म्हणून केले. ज्या काही कार्यक्रमात त्यांना बिदागी प्राप्त होई त्यातून अनेक कुटुंबाना त्यांनी मदत केली.
मिळालेल्या तुटपुंज्या बिदागीतून काटकसर करून संसार कसा उभा करावा याचे धडेच मंगला यांच्या आई प्रतिभा मराठे यांनी घालून दिले. विवाहानंतर सुशील ओक यांनी स्वत:च्या मुलींसह परिसरातील मुला-मुलींसाठी संस्कार वर्ग सुरू केले. रघुवीर ओक संघाशी निगडित असल्याने सुशील ओक यांना संघ संस्काराची ओळख झाली. आई-वडिलांचे संस्कार आणि पती यांच्या संघाच्या कार्यामुळे त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळाली. 1992 मध्ये करसेवेत सुशील ओक यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.
त्यावेळी पोलिसांकडून झालेला अत्याचार त्यांनी अनुभवला आहे. गुजरातमधील भूज येथे झालेल्या भूकंपानंतर पुनर्वसनाच्या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. सांसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर ओक दाम्पत्याने सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे.
विविध कला प्रकारात पारंगत असलेल्या परिणीता मराठे यांना आईकडून संगीताचा वारसा मिळाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी संवादिनी वादनाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
विशारदपर्यंत शिक्षण पूर्ण केले. विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यानंतर 1991 मध्ये पंडित प्रमोद मराठे यांच्याकडे त्यांनी पुढील शिक्षण घेण्यास सुरुवात केली. 1995 पासून गांधर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राथमिक गायन व संवादिनी वादन शिकविण्यास सुरुवात केली. त्यांचे अनेक विद्यार्थी या कलेचा अभ्यास करत आहेत. गांधर्व महाविद्यालयाचा व्याप वाढल्यानंतर व्यवस्थापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी वेळ दिला.
महाविद्यालयात कथक आणि भरतनाट्यम् नृत्याचे वर्ग सुरू झाल्यानंतर त्यांनी स्वत: दोन्ही नृत्यप्रकारात प्राविण्य मिळविले.
जाहिरात