गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हास्ययोगाला अनन्यसाधारण महत्त्व : अनुराधा मराठे !!
लोकमान्य हास्ययोग संघाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्यासांगता समारंभानिमित्त कार्यक्रम !!
पुणे : हास्ययोगाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हास्यातून मानसिक शक्ती मिळते; मन एकाग्र होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांनी आज केले.
लोकमान्य हास्ययोग संघाचा स्थापनादिन आणि रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आज (दि. 6) मराठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
लोकमान्य हास्ययोग संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना अनुराधा मराठे. समवेत अनुराधा भांडारकर, डॉ. प्रसाद आंबिकर, भाऊसाहेब जाधव, बंडोपंत फडके.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव होते. डॉ. संदीप बुटाला, लोकमान्य हास्ययोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद आंबिकर, कार्याध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव स्मिता मोहिते, उपाध्यक्षा पुष्पा भगत, कोषाध्यक्ष अनुराधा भांडारकर मंचावर होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दि. 6 आणि दि. 7 असे सलग दोन दिवस लोकमान्य हास्ययोग संस्थेतर्फे सदस्यांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठांच्या सादरीकरणाचे कौतुक करून अनुराधा मराठे म्हणाल्या, अनेकांना शारीरिक व्याधी असतीलही पण त्या व्याधी विसरून ज्येष्ठांनी हास्ययोगाद्वारे मन एकाग्र करून दाखविले आहे. उपस्थितांच्या आग्रहाखातर मराठे यांनी ‘ही वाट दूर जाते’ हे गीत सादर केले.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, लोकमान्य हास्ययोग संस्थेचे कार्य खूप मोठे आहे. गरजूंना मदतीचा हात देण्यापासून ज्येष्ठांच्या मनातील एकलेपणाची भावना दूर करण्याचे बहुमोल कार्य सुरू आहे. जीवनात हास्यापेक्षा मोठे काही नाही. कितीही समस्या आल्या तरी जीवन हसून-खेळून जगायचे असते. परिस्थिती अनुकूल कशी करता येईल याचा जर विचार केला तर समस्या सुटू शकतात.
आपण पूर्वी कोण होतो, आपले पद काय होते हे विसरून साठीनंतरचे आयुष्य वेगळ्या वाटेने जगायचे असते. स्वत:बरोबर कुटुंबियांनाही आपण गंभीर करणार असाल तर तुम्ही कुटुंबाला नकोसे होता. तुम्ही आनंदी असाल तर तुमचेही आनंदानेच स्वागत होईल.
डॉ. संदीप बुटाला यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीस लोकमान्य हास्ययोग संघाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद आंबिकर यांनी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील कार्याचा आढावा सादर केला. भविष्यात करण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही माहिती दिली.
मान्यवरांचे स्वागत डॉ. प्रसाद आंबिकर, पुष्पा भगत, बंडोपंत फडके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मोहिते यांनी केले तर आभार अनुराधा भांडारकर यांनी मानले.
———–————————————————–
जाहिरात