गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘संगीत हीच व्यास कुटुंबियांची ऊर्जा’ : पंडित सुहास व्यास !!
गानवर्धन संस्थेचा ‘स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार’ प्रदान समारंभ !!
पुणे : ‘संपूर्ण व्यास कुटुंब जोडणारा संगीत हाच धागा आहे आणि अभिजात भारतीय संगीत हीच आमच्या कुटुंबाची ऊर्जा आहे’, अशी भावना ज्येष्ठ गायक पंडित सुहास व्यास यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
गानवर्धन संस्थेतर्फे कै. स्वरगंधा टिळक स्मृती निमित्ताने दिला जाणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‘स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार’ पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास कुटुंबास गुरुवारी येथे प्रदान करण्यात आला.
एस. एम. जोशी सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक वारसा पुढे नेणारे त्यांचे तीनही सुपुत्र पंडित सुहास व्यास, पंडित सतीश व्यास आणि शशी व्यास यांचा या वेळी गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि चाळीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गानवर्धन संस्थेतर्फे कै. स्वरगंधा टिळक स्मृती निमित्ताने दिला जाणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‘स्वरगंधा सांगीतिक कुटुंब पुरस्कार’ पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास कुटुंबास गुरुवारी (दि. 15) प्रदान करण्यात आला. तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी (डावीकडून) आलापिनी जोशी, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुहास व्यास, पंडित सतीश व्यास आणि शशी व्यास, गानवर्धनचे सचिव रवींद्र दुर्वे.
व्यासपीठावर पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुहास व्यास, पद्मश्री पंडित सतीश व्यास, शशी व्यास, आलापिनी जोशी, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, सचिव रवींद्र दुर्वे उपस्थित होते.कार्यक्रमास संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंदकुमार आझाद, ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडे, डॉ. शुभांगी बहुलीकर, चैत्राली टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारामागील भूमिका सांगताना आलापिनी जोशी यांनी कराड येथील स्वरनिर्झर संस्थेची माहिती दिली. चैत्राली टिळक यांचाही सन्मान करण्यात आला.
पंडित सुहास व्यास म्हणाले, ‘व्यास कुटुंबाचा प्रेरणास्रोत म्हणजे आमचे बाबा पंडित सी. आर. व्यास. त्यांनी संगीत केवळ शिकवले नाही तर आनंद घेणे आणि देणे याचे मोलाचे संस्कार दिले.
सर्व प्रकारचे आणि सर्व कलाकारांचे संगीत ऐकायला शिकवले. संगीत ही क्लिष्ट कला नाही, तिचा आत्मा गवसला की, त्यात रमून जाता येते. बाबांनी हे शिकवले, त्यामुळे हा सत्कार त्यांनी दिलेल्या संस्कारांचा आहे. मनाच्या शांतीसाठी भारतीय अभिजात संगीतासारखा दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले.पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, ‘आम्ही सर्व संस्कारांच्या काळात घडलो, जे खोलवर रुजतात. विद्या आपण बाहेरून शिकतो पण कला आतून प्रकट होते आणि ती संस्कारांतून घडते. व्यास बुवांनी हे संस्कार दिले.
राग अंगाचा अतिशय सूक्ष्म विचार त्यांनी मांडला. अवघ्या दोन स्वरांत राग उभा करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. त्यांनी गायिलेल्या राग पूरिया, नटभैरव, मलुहा केदार, हमीर या आठवणी आजही ताज्या आहेत. माझ्या हस्ते व्यासपुत्रांचा सत्कार हा मला लाभलेला पंडित सी. आर. व्यास यांचा आशीर्वाद आहे, अशी माझी भावना आहे,’.
गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात म्हणाले, पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पंडित सुहास व्यास यांचा अमृत महोत्सव या निमित्ताने संस्थेने या वर्षी व्यास कुटुंबियांना हा पुरस्कार देण्याचा योग जुळवून आणला आहे.
संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेचा निकाल यावेळी जाहीर करण्यात आला. आनंद सराफ आणि डॉ. मिलिंद भोई यांनीही कलाकारांचा सन्मान केला. गानवर्धनच्या कोषाध्यक्ष सविता हर्षे यांनी सूत्रसंचालन केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पंडित सुहास व्यास यांचे गायन झाले. त्यांनी राग पूर्वा कल्याण सादर केला. ‘होवन लागी सांझ’ ही रचना सादर केली. त्यांना भरत कामत (तबला) आणि सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. नीरज गोडसे आणि केदार केळकर यांनी तानपुरा आणि सहगायन साथ केली. शेवटी पद्मश्री पंडित सतीश व्यास यांचे संतूरवादन झाले.
त्यांनी राग कौशिकध्वनी मध्ये झपताल आणि त्रितालातील रचना सादर केल्या. त्यांना पंडित रामदास पळसुले यांनी तबल्याची साथ केली.
जाहिरात