गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘मुक्तछंदा’ ने कवितेचे लोकशाहीकरण केले !!
ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांचे प्रतिपादन !
रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानचा काव्यकिरण पुरस्कार वैजयंती आपटे यांना प्रदान !!
पुणे : मौखिक परंपरेच्या प्रभावामुळे जुन्या काव्यरचनेवर वृत्त, मात्रा, छंद, गणना..यांची बंधने आली होती. मुक्तछंदाने ही बंधने सैल केली आणि कविता या लेखनप्रकाराचे लोकशाहीकरण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका, समीक्षक, वक्त्या डॉ. नीलिमा गुंडी यांनी रविवारी येथे केले.
सकस मुक्तछंद काव्यनिर्मितीसाठी रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘काव्यकिरण पुरस्कार’ कवयित्री वैजयंती आपटे यांना रविवारी डॉ. नीलिमा गुंडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.पत्रकार भवन येथे झालेल्या या समारंभात रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, पुरस्कार सन्मानित कवयित्री डॉ. वैजयंती आपटे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. गुंडी यांनी मराठी साहित्यातील मुक्तछंद या लेखनप्रकाराची पार्श्वभूमी विशद केली. ‘मुक्तछंद या संज्ञेतही छंद आहे. फक्त छंदाची पोलादी बंधने सैल झालेली असतात. पण तरीही सूक्ष्म स्वरूपातील लय मुक्तछंदात असतेच. कवी अनिल यांनी मुक्तछंद रूढ केला. पुढे अनेक कवींनी तो वापरला. गेय कवितेचा एक काळ होता. परंतु नाद हा अर्थाचा प्रतिध्वनी वाटला पाहिजे, असा विचार रुजवत पुढच्या पिढीतील कवींनी मुक्तछंद हा मुक्त शैली, या अर्थानेही वापरला.
त्यातून अनेकांना कवितालेखनाचा जणू परवाना मिळाला मात्र, बंधने सैल झाली तरी कवितेतील लय लयास जाता कामा नये,’ असे डॉ. गुंडी यांनी स्पष्ट केले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. आपटे म्हणाल्या,’
मनातील भाव सजीव चित्र बनून कागदावर उतरतो. अंतःकरणाचा आवाज साज होउन झंकारतो. आपल्याच मनामध्ये लपलेल्या अंधारातील खोल भावनेशी प्रकाशाचे मीलन होते. तेव्हा कवीच्या लेखणीतून उतरणाऱ्या प्रत्येक शब्दाची कविता होते.
ह्या उक्तीनुसार कविता माझ्या आयुष्यात आली. तंत्रज्ञान आणि संगणक विषयातल्या अद्ययावत ज्ञानात पारंगत असले तरी जीवनातल्या विविध भावनांचा आविष्कार माझ्या लेखनात उतरला होता. मुळात साहित्याबरोबर प्रवास करताना जीवनाचं तत्व साहित्यात प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातल्या चढउतारात अनेक वेळा उजेडाची किरणे उपभोगायला मिळाली आणि कातरवेळसुद्धा वाट्याला आली. अशा वेळी काळोखातून आरपार पाहण्याचं बळ देणारे अनाम हात देवदूतासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे मनावर झालेले आघात शब्दबद्ध होत गेले, बोलता न येणार्या शब्दांच ओझं खूप जास्त असतं, व्यक्त होणाऱ्या शब्दांनी माझं ओझं अलगद उचललं आणि कविता घडत गेली.
अनेक अनुभवांची कविता झाली. माझे आजोबा ल. गो. विंझे यांनी मराठी संस्कृत साहित्य क्षेत्राला भरीव योगदान दिले आहे. मला मिळालेला काव्य किरण २०२४ हा पुरस्कार मी माझ्या आजोबांच्या स्मृतींना सादर अर्पण करते,’ असे त्या म्हणाल्या.करम प्रतिष्ठानचे भूषण कटककर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. ‘ अलीकडे गजल वृत्त आणि अन्य छंदोबद्ध कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जात आहे. पण रचनाकौशल्याकडे अधिक लक्ष पुरवण्याच्या नादात आशय मागे पडतो की काय, असे चित्र आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक उत्तम आशयाच्या मुक्तछंद कवितेची दखल घेतली जावी, ही भूमिका आहे, असे ते म्हणाले.
प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक करताना, ‘ताज्या दमाच्या, अल्पावधीत कर्तृत्व सिद्ध केलेल्या आणि उभरत्या प्रतिभेचे कौतुक करण्यासाठी हा पुरस्कार असल्याचे सांगितले.
वंदना लोखंडे यांनी परिचयपत्राचे तर प्राजक्ता वेदपाठक यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. डॉ. बाबूल पठाण यांनी डॉ. आपटे यांचा सत्कार केला. अपर्णा डोळे यांनी कविसंमेलनाचे तर शिल्पा देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा काळे, प्रतिभा पवार, विनायक अनिखिंडी, अपर्णा डोळे, मीनाक्षी नवले, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. ज्योती रहाळकर, तनुजा चव्हाण, माधुरी अशिरगडे, स्वप्नील पोरे, निलाक्षी महाडिक, भारती पांडे यांचा सहभाग होता.
जाहिरात