गोल्डन आय न्यूज नेटवर्क
जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांमध्ये देव दिसला : सुमेधा चिथडे !!
सहजीवन व्याख्यानमालेत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ विषयावर गुंफले पुष्प !
पुणे : राष्ट्रप्रेम मनात जागवायला कुठल्या प्रशिक्षणाची गरज नसते, तर ते मनात असावे लागते. राष्ट्र प्रथम मानून सेवा करणाऱ्या सैनिकाची आठवण आपल्याला फक्त संकट काळात येते. देशाच्या सीमांचे रक्षण करताना जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या जगण्याचा आपण कधी विचार करतो का? स्वत:पलिकडचे जगणे काय असते हे सेवाकार्यातून दाखवून देणाऱ्या सैनिकांमध्ये आपल्याला देव दिसला अशी कृतार्थतेची भावना ‘सिर्फ’च्या संस्थापिका सुमेधा चिथडे यांनी आज व्यक्त केली.
सुमेधा चिथडे
सहकारनगरमधील सहजीवन व्याख्यानमालेत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विषयावर पुष्प गुंफताना चिथडे बोलत होत्या. मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे व्याख्यानमाला सुरू असून व्याख्यानमालेचे यंदाचे 23वे वर्ष आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, नेहा कुलकर्णी, स्मीता पाटील, स्वाती कुलकर्णी, अर्चना जोशी, जाई जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
समाजाच्या बहुमोल सहकार्यातून सैनिकांसाठी सियाचेन येथे ऑक्सिजन प्लॅन उभा करता आला, असे सांगून चिथडे म्हणाल्या, सैन्यदलातील जवानांना, त्यांच्या कुटुबियांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आपल्या नजरेत भरतात पण त्यांचा त्याग कुणाला दिसत नाही. राष्ट्र सर्वप्रथम या जाणिवेतून सैनिक जगत असतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवान देशांच्या सीमांचे रक्षण करीत असतो.
समाज आपल्यासाठी काय करेल याचा विचार न करता तो आपली ड्यूटी बजावत असतो. सैनिकाचे जगणे बुद्धिपलिकडचे, विचारापलिकडचे असते.
अतिदुर्गम अशा सीमावर्ती भागाची माहिती घेतल्यानंतर, प्राणवायूची किंमत कळल्यानंतर आपण जवानांसाठी काय करू शकतो हा माझ्यादृष्टीने महत्त्वाचा प्रश्न होता. राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंतांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीचे कार्य हाती घेतले.
स्वच्छ हेतू, कार्यात पारदर्शकता ठेवल्याने समाज माझ्या पाठीमागे उभा राहिला. हे कार्य हाती घेतल्यानंतर समाजमन वाचता आले. निधी उभारताना श्रीमंतांमधील गरीब अन् गरीबांमधील श्रीमंत दिसले. या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून दखल घेतल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
पुढच्या पिढीसमोर आपण आदर्श कोठला ठेवणार आहोत असा प्रश्न करून चिथडे पुढे म्हणाल्या, वैचारिक नैतिकतेचे प्रदूषण झाले असल्याने सैनिकांच्या पराक्रमाचे अवमूल्यन होत आले आहे. इतिहासाची पाने पुसली गेली आहेत. पुढच्या पिढीला सैनिकांचा त्याग, शौर्य आणि धैर्याची माहिती करून देणे फार गरजेचे आहे.
राष्ट्रप्रेम ही काही ठराविक काळापुरती दाखविण्याची गोष्ट नाही तर ती 24 तास जगायची असते. राष्ट्रासाठी जगणे काय असते याचे संस्कार असंख्य सैनिक आपल्या कृतीतून दाखवून गेले आहेत. परिचय आणि सूत्रसंचानल रवींद्र खरे यांनी केले.
जाहिरात