गोल्डन आय न्यूज नेटवर्क
युवा संवादिनी वादकांचे रंगतदार सादरीकरण
‘सप्रेम’ अंतर्गत रसिकांनी अनुभवली सुरेल मैफल
पुणे : युवा संवादिनी वादकांना स्वतंत्र स्वरमंच देणाऱ्या ‘सप्रेम’ अर्थात संवादिनी प्रेमी मंडळ या अभिनव उपक्रमात बुधवारी युवा वादकांचे रंगतदार सादरीकरण रसिकांनी अनुभवले. सायंकालीन रागांचे सौंदर्य या वादनातून पुढे आले.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘सप्रेम’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत युवा कलाकारांचे एकल संवादिनी वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळाली. शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
युवा संवादिनी वादकांचे रंगतदार सादरीकरण
‘सप्रेम’ अंतर्गत रसिकांनी अनुभवली सुरेल मैफल
‘सप्रेम’ या अभिनव उपक्रमाविषयी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे म्हणाले, ‘ज्या वाद्याने आपल्याला भरभरून दिले, त्या वाद्यासाठी आपण काही करणे, मला आवश्यक वाटले. त्यातून संवादिनी प्रेमी मंडळ हा उपक्रम सुरू झाला. उपक्रमाची सुरुवात महिला संवादिनी वादकांच्या सादरीकरणाने केली. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. युवा संवादिनी वादकांना ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे’.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पंडित प्रमोद मराठे यांचे शिष्य स्वरूप दिवाण यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी समयानुसार रुपक ताल, अद्धा तीनतालातील रचना सादर केल्या. वादनातील स्पष्टता, सहजता आणि सुरेलता, ही त्यांच्या वादनाची वैशिष्ट्ये होती. ‘नैना रसिले’ या ठुमरीने त्यांनी आपल्या वादनाची सांगता केली. त्यांना प्रसाद महाजन (तबला) यांनी साथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य अनंत जोशी यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी राग मालगुंजी आणि पंडित कान्हेरे यांनी निर्माण केलेला राग भिन्न कंस सादर केला. दोन्ही गंधारांचा वापर या वादनात होता. मिश्र शिवरंजनीमधील रचना पेश करुन त्यांनी सांगता केली. त्यांना रोहित मुजुमदार यांनी पूरक तबलासाथ केली.
श्रीकांत नगरकर यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले. स्वरुप दिवाण, अनंता जोशी, श्रीकांत नगरकर यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष मोहन उचगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जाहिरात