गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘इच्छामरण’ जीवनाला भिडणारी साहित्यकृती : संजय सोनवणी !!
पुणे : वैद्यकीय क्षेत्राने संशोधन आणि उपचारात भरारी घेतली असली तरी नैतिकतेचा होत असलेला ऱ्हास ही जागतिक पातळीवरील समस्या आहे. वैद्यक क्षेत्रात असलेली अनैतिकता बघून भारतातही इच्छामरण असले पाहिजे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
आयुष्यातील सुख-दु:खाचे अवडंबर न करता संगीता लोटे व्यक्त झाल्या असून त्यांच्या लिखाणात साहित्यसौंदर्यही आहे. ‘इच्छामरण’ ही जीवनाला भिडणारी साहित्यकृती आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.
इच्छामरण’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) चंद्रकांत जोशी, संभाजी सावंत, हनुमंत कुबडे, संगीता लोटे, संजय सोनवणी, अनिल कुलकर्णी, अमृता तांदळे.
संगीता भारत लोटे लिखित ‘इच्छामरण’ या सत्य घटनेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सोनवणी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. भावार्थ, कोथरूड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक, समीक्षक चंद्रकांत जोशी, मराठी भाषा साहित्य कला संवर्धन मंडळाचे अध्यक्ष हनुमंत कुबडे, अनुबंध प्रकाशनचे संचालक अनिल कुलकर्णी, निवृत्त पोलिस अधिकारी संभाजी सावंत, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या अमृता तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरीबांचे डॉक्टर म्हणून डॉक्टर भारत लोटे यांची ओळख होती. रत्नागिरी जिल्ह्यात केलेल्या उत्कृष्ट रुग्णसेवेबद्दल त्यांना राज्य शासनाचा मानाचा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे. भारत लोटे यांच्यावर 2017 मध्ये पुण्यातील एका रुग्णालयात चुकीचे उपचार करण्यात आले. त्यामुळे झालेला शारीरिक व मानसिक त्रास, दवाखान्याकडून मिळालेली हीन वागणूक, मदतीबाबत शासनाने दाखविलेली अनास्था यामुळे डॉक्टर लोटे यांच्यावर इच्छामरण मागण्याची वेळ आली.
या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली होती. याच सत्य घटनेवर आधारित ‘इच्छामरण’ हे आत्मकथनपर पुस्तक असल्याचे संगीता लोटे यांनी लिखाणामागील हेतू स्पष्ट करताना सांगितले.
वेदना ही साहित्याचा आत्मा आहे, असे सांगून सोनवणी पुढे म्हणाले, भावनांना आवर घालून पुस्तकाचे वाचन केले. आयुष्यात आलेले अनुभव संगीता लोटे यांनी प्रामाणिकपणे मांडले आहेत. ही साहित्यकृती समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
संगीता लोटे यांनी हा अतिशय संवेदनशील विषय प्रभावीपणे मांडला असल्याचे अनिल कुलकर्णी म्हणाले. मानसिक, वैचारिक दृष्टीकोनातून या पुस्तकाचे वाचन झाले तर प्रत्येकाला आवडेल, असेही ते म्हणाले. संभाजी सावंत म्हणाले, ज्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्यांनाच उपचारासाठी इतरांसमोर याचना करावी लागली या सारखी दुसरी दु:खदायक घटना नाही.
इच्छामरणाचा अधिकार असला पाहिजे, असे आग्रही मत व्यक्त करून चंद्रकांत जोशी म्हणाले, जीवनाचा सखा लौकिक रूपात मिळालेला असतो; पण तो खऱ्या अर्थाने रोमारोमात भिनलेला असतो. जीवनातील अगतिकता ‘इच्छामरण’ या आत्मकथनपर पुस्तकातून प्रभावीपणे मांडली आहे. हनुमंत कुबडे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अमृता तांदळे यांनी तर सूत्रसंचालन पूनम अहिरे यांनी केले.