गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजाला किमान 30 जागा मिळाव्यात !!
सकल ब्राह्मण संघाची भाजपाकडे मागणी : मित्रपक्षांनाही निवेदन !!
पुणे : ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे. सध्या राज्यातील ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधीत्वाची अत्यंत आवश्यकता आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी किमान 30 जागा ब्राह्मण समाजाला द्याव्यात, अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाने भारतीय जनता पार्टीकडे केली आहे, अशी माहिती सकल ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे बहुभाषी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, भालचंद्र कुलकर्णी, तेजस फाटक, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड, कसबा, कोथरूड, शिवाजीनगर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुलुंड या विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या निर्णायक आहे.
या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिल्यास, भाजपला विजय मिळवणे सोपे होईल. याच आशयाचे निवेदन भाजपाचे मित्र पक्ष शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दिले आहे.
चिंचवड मतदारसंघात बहुजन समाजातील इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली तरी बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण उमेदवाराला संधी दिल्यास, या मतदारसंघात विजय मिळवणे सहज शक्य होईल.
राज्यातील 45 विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान 30 जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी सकल ब्राह्मण समाजाची मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्य व्ोळी आम्ही त्यांची नावे सादर करू.
महाराष्ट्रीयन ब्राह्मण तसेच बहुभाषक ब्राह्मण मिळून अनेक मतदारसंघांमध्ये 80 हजारांहून अधिक मतदार आहेत. ब्राह्मण समाज नेहमीच विचारपूर्वक मतदान करतो, त्यामुळे त्यांच्या मतांचा योग्य वापर झाला पाहिजे.
गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत.
भाजपकडे ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मते आहेत, विशेषत: चिंचवड, कसबा, कोथरूड, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि शिवाजीनगर मतदारसंघात. ब्राह्मण समाजाने नेहमीच कर्तव्य म्हणून मतदान केले आहे, मात्र यावेळी भाजपने नेतृत्वाची संधी देऊन ब्राह्मण उमेदवाराला उभे करावे, अशी समाजाची विनंती आहे.
राज्यभरातील विविध समाजांनी संघटित होऊन राजकीय जागरूकता दाखवली आहे.
ब्राह्मण समाजही आता जागरूक होऊन संघटित होत आहे. शिक्षण, नोकरी यासारख्या क्षेत्रात आरक्षण नसतानाही ब्राह्मण समाज आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता व गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहे. म्हणून भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये.
राज्यभरात अनेक मतदारसंघांमध्ये सक्षम ब्राह्मण नेते आहेत, मात्र त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. संधी मिळाल्यावर त्यांनी नेहमीच त्यांचे नेतृत्व सिद्ध केलेले आहे. म्हणून, योग्य उमेदवारांना संधी दिल्यास ब्राह्मण समाजही यशस्वी नेतृत्व देऊ शकेल.
ब्राह्मण समाजाने आतापर्यंत संघर्ष नको म्हणून बरेच त्याग केले आहेत, पण आता समाजाला संघर्ष करण्याची गरज आहे आणि यासाठी पक्षाने ब्राह्मण उमेदवारांना संधी देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा. ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कायम उभे राहून भाजपला पाठिंबा दिला आहे आणि भविष्यातही तो पाठिंबा कायम राहील. मात्र, या वेळी उमेदवारी न मिळाल्यास समाजाला आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागेल, असे पत्रात नमूद केले आहे.
गौड ब्राह्मण समाज, गौर ब्राह्मण संघटन, पुणे, विप्र फौऊंडेशन, अखिल ब्राह्मण संघ, राष्ट्रीय सेवा संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, परशुराम सेवा संघ, आम्ही सारे ब्राह्मण, ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्रीय ब्राह्मण संघ, बहुभाषिक ब्राह्मण संघ आदी संघटनांचे प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते.
__________________________________________
जाहिरात