गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होणार थाटामाटात !!
महिलांसाठी भाग्यलक्ष्मी स्पर्धा : धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन !
डॉ. मनिषा सोनवणे, सौ. सुषमा खटावकर, कु. मधुरा धामणगावकर यांचा तेजस्विनी पुरस्काराने होणार गौरव
४०० हून अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव
पुणे : पुण्याची गौरवशाली ओळख असलेल्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाला शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी सुरुवात होत असून धार्मिक, सामाजिक उपक्रमांबरोबरच महिलांसाठी भाग्यलक्ष्मी स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार, दि. 4 ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित महिला महोत्सव शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत साजरा होणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा दिमाखदार रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
यंदा महिला महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. अलका लांबा यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. संध्या सव्वालाखे, पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद या उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. यंदा सोहम संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. मनिषा अभिजित सोनवणे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून तर आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मा. सौ. सुषमा खटावकर, क्रीडापटू मा. मधुरा धामणगावकर यांना तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून खडतर परिस्थितीत आपले मुलांना चांगली शिकवणूक, विचार देऊन आदर्शवत नागरिक घडविणाऱ्या सुमारे चारशेहून अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना भरघोस बक्षिसांची मेजवानी असणार आहे.
शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता म्युझिकल तंबोला (हाऊजी) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता कन्यापूजन सोहळा संपन्न होणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक कन्येस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
सोमवार, दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता श्री विष्णू सहस्रनाम आणि श्री सुक्त पठणाचे आयोजन श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, शिवदर्शन येथे करण्यात आले आहे.
बुधवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून सहभागी प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
गुरुवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत परिक्षक स्पर्धेचे मूल्यांकन करणार आहेत.
शुक्रवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाआरती होणार असून प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
होम मिनिस्टर, मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि महाआरतीच्या दिवशी लकी-ड्रॉ देखील काढला जाणार असून स्पर्धेतील विजेत्या महिलांना रोख बक्षिसांसह एलइडी टिव्ही, ओव्हन, मिक्सर, गॅस शेगडी, वॉशिंग मशीन व इतर गृहपयोगी वस्तू बक्षिसरूपाने दिल्या जाणार आहेत.
या सर्व स्पर्धांसाठी व कन्यापूजन, महाआरतीसाठी येणाऱ्या महिलांना नावनोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी मा. आबा बागुल जनसंपर्क कार्यालय, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे – 9 येथे केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 7972771937/9850903535
महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतून अध्यक्ष मा. आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत महिला महोत्सव भरविण्यास सुरवात केली आणि त्याची धुरा जयश्री बागुल यांच्याकडे सोपविली.
गेल्या 24 वर्षांपासून त्या या महिला महोत्सवाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. दरवर्षी हजारो महिला या महोत्सवात सहभागी होतात.
पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाअंतर्गत मंदिरात होमहवन, महाप्रसाद, कुंकुमार्चन व आरती तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महोत्सवाचा तसेच जागृत देवस्थान असलेल्या लक्ष्मीमातेच्या दर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
__________________________________________
जाहिरात