गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आयसीसीआरतर्फे 27 सप्टेंबरला गायन-नृत्य मैफल !!
आयसीसीआरतर्फे 27 सप्टेंबरला डॉ. अर्चना सहकारी यांचे गायन तर मौमिता वत्स घोष यांचा ओडिसी नृत्याविष्कार !!
पुणे : केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) पुणे विभागीय कार्यालय आणि भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 27 सप्टेंबर) हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका डॉ. अर्चना सहकारी यांच्या गायनाचा तसेच ओडिसी नृत्यांगना मौमिता वत्स घोष यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. अर्चना सहकारी
‘होरायझन’ उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सेनापती बापट रोड जवळील भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात होणार आहे, अशी माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालयाचे निदेशक सुदर्शन शेट्टी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
डॉ. अर्चना सहकारी यांनी गुरुकुल पद्धतीने सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अलका देव-मारुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले आहे. शास्त्रीय गायनासह धृपद, ख्याल, टप्पा, चतुरंग, तराणा, ठुमरी, भजन, गझल, भावगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीत या प्रकारात त्यांचे प्रभुत्व आहे. डॉ. अर्चना सहकारी या अनेक पुरस्कारांनी सन्मानित असून देश-विदेशातील प्रसिद्ध संगीत महोत्सवात त्यांनी आपली गायन कला प्रस्तुत केली आहे.
मौमिता वत्स घोष
मौमिता वत्स घोष यांनी लहान वयातच गुरू माधवी मुद्गल यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले. तसेच विख्यात गुरू, पद्मविभूषण केलुचरण मोहपात्रा यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. मौमिता यांनी देश-विदेशात नृत्याचे कार्यक्रम सादर केले असून अनेक नृत्य महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
_________________________________________
जाहिरात