गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. प्रभा अत्रे यांना गायन, नृत्याविष्काराद्वारे अभिवादन !
‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष’ दोन दिवसीय महोत्सवाची सांगता !!
पुणे : स्वरयोगिनी, पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी रचनलेल्या विविध बंदिशींचे सादरीकरण तसेच त्यांच्या बंदिशींवर आधारित कुचिपुडी नृत्याविष्काराद्वारे डॉ. प्रभा अत्रे यांना सांगीतिक अभिवादन करण्यात आले.
डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांमधील कार्यावर आधारित ‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष’ या दोन दिवसीय महोत्सवाचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 22) स्वर-नृत्य-प्रभाअंतर्गत डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित संगीत-नृत्याचा अनोखा कार्यक्रम झाला. यात डॉ. मनिषा रवी प्रकाश, पियू मुखर्जी यांचे गायन तर नृत्यगुरू वैजयंती काशी आणि सहकाऱ्यांनी कुचिपुडी नृत्य सादर केले.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशी सादर करताना पियू मुखर्जी.
गायक कलाकारांना पांडुरंग मुखडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाचे आयोजन डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी केले होते.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या व डॉ. उषा अत्रे-वाघ यांच्या कन्या डॉ. मनिषा रवी प्रकाश यांनी सादर केलेल्या ‘अभिमानाने मीरा वदते हरी चरणाशी माझे नाते’ प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ही प्रार्थना डॉ. प्रभा अत्रे व त्यांच्या भगिती डॉ. उषा अत्रे-वाघ यांनी एकत्रितपणे नागपूर आकाशवाणीवर सादर केलेले एकमेव गीत असल्याची आठवण या वेळी सांगण्यात आली.
या नंतर पश्चिम बंगालमधील सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका पियू मुखर्जी यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचना सादर केल्या.
बिलासखानी तोडीमधील ‘मैं तोरी शरण आयी जगतजननी’, ‘जग माता तू भवानी चामुंडे महाकाली’ या बंदिशी बडाख्याल, मध्यलय आणि द्रुत एकतालात सादर केल्या. ‘सुनो मोरी अरज, कैसे धरू धीरज’ ही देसरागातील मध्यलय रुपकमधील बंदिश प्रभावीपणे सादर केली. तसेच ‘तानी दे रे ना तदाने तान दीम्’ हा तराणा सादर करून त्यांनी रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता ‘आए नही मोरे शाम’ या मिश्र भैरवीतील ठुमरीने केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बेंगळुरू येथील नृत्यगुरू वैजयंती काशी आणि त्यांच्या शिष्यांचे बहारदार कुचिपुडी नृत्य सादरीकरण झाले. सादरीकरणाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित नृत्याविष्कारात ‘माता भवानी काली’ ही त्रिशक्तीची रूपे दर्शविणारी प्रस्तुती केली.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर नृत्याविष्कार सादर करताना वैजयंती काशी व सहकलाकार.
या नंतर मर्यादापुरुषोत्तम श्री राम आणि नटखट श्री कृष्णाचे वर्णन करणाऱ्या ‘कोई राम कहे, कोई शाम कहे’ या रचनेवर वैजयंती काशी यांनी एकल नृत्य सादर केले. ‘सगुण स्वरूप नंदलाल’ या रचनेवरील नृत्याविष्कारात भक्तीचे अनोखे दर्शन घडविले. डॉ. प्रभा अत्रे यांच्या विविध रचनांवर सादर झालेला विलोभनीय नृत्याविष्कार रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला.
डॉ. प्रभा अत्रे यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन करणारा पोवाडा शाहीर हेमंत मावळे यांनी रचला होता. या पोवाड्याचे दृकश्राव्य माध्यमातील चित्रिकरण या प्रसंगी दाखविण्यात आले.
कलाकारांचा सत्कार निलिमा छापेकर, वीणा शुक्ला, रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.
_________________________________________
जाहिरात