गोल्डन आय न्यूज नेटवर्क
साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीचे टोळीयुद्ध बंद पाडण्यात प्रा. मिलिंद जोशी यांचा पुढाकार ;;
आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने प्रा. मिलिंद जोशी यांचा गौरव !!
पुणे : प्रा. मिलिंद जोशी यांची लेखन आणि वक्तृत्वशैली अनोखी आहे. त्यांनी साहित्य परिषदेला लोकाभिमुख केले. संस्थात्मक पातळीवर काम करीत असताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक बंद करून निवडीतील राजकारण व टोळीयुद्ध बंद पाडण्यासाठी योग्य हस्तक्षेप केला. हे ऐतिहासिक कार्य प्रा. जोशी यांनी केले, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी काढले.
आडकर फौंडेशनतर्फे ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा गौरव डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे आज (दि. 6) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आडकर फौंडेशन आयोजित ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) ॲड. अविनाश आव्हाड, ॲड. प्रमोद आडकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. अविनाश आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर व्यासपीठावर होते. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, ॲड. भास्करराव आव्हाड यांचा वाढदिवस आडकर फौंडेशनतर्फे गेली 29 वर्षे साजरा केला जात आहे. दि. 7 सप्टेंबर या त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ॲड. भास्करराव आव्हाड यांच्याप्रमाणेच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी ॲड. भास्करराव आव्हाड स्मृती पुरस्काराने गौरविले जाते आहे.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, निवडणुकीमुळे पात्रता नसलेले अनेक लेखक अध्यक्ष झाले. या रणधुमाळीत चांगले लेखक उतरले नाहीत. त्यामुळे ते अध्यक्ष होऊ शकले नाहीत. प्रा जोशी यांनी घटना बदलासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे चांगले अध्यक्ष मिळाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात योग्य ती शिस्त व संघटितपणे कार्य करून संस्थेचा डोलारा प्रा. जोशी सक्षमपणे सांभाळत आहेत. या पुरस्कारामुळे प्रा. जोशी यांच्या कार्य-कर्तृत्वाच्या सीमा विस्तारत जातील, असा विश्वासही व्यक्त केला. ॲड. आव्हाड यांचे विविध क्षेत्रातील कार्य मोलाचे होते.
त्यांच्या स्मृती पुरस्काररूपाने जागविणे हे कौतुकास्पद कार्य आहे. पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्याची दृष्टी ॲड. प्रमोद आडकर यांच्याकडे आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.डॉ. राजा दीक्षित म्हणाले, प्रा. मिलिंद जोशी यांच्या साहित्यकृतींमध्ये ग्रामीण, शहरी व निमशहरी पात्रांचे मनोविश्लेषण दिसून येते. अतर्क्य गोष्टींचा वेध, प्रसन्न, प्रभावी, ओघवती लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. प्रा. जोशी उत्तम योजक, अभियंता, अभ्यासक, लेखक आणि वक्ता आहेत. वैचारिक, ललित आणि समीक्षण प्रकारातील त्यांचे लिखाण उत्तम दर्जाचे असून त्यांचे संस्थापटूत्वही स्पृहणीय आहे.
सत्काराला उत्तर देताना ॲड. भास्करराव आव्हाड हे सर्जनशील, सकारात्मक, बहुआयामी व्यक्तीमत्व होते. त्यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार मला मिळाल्याचा विशेष आनंद आहे, असे नमूद करून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, लिहिणे आणि बोलणे ही दोन्ही शब्दशक्तीची महत्त्वाची रूपे आहेत. त्यांना साहित्य संस्कृतीच्या गाभाऱ्यात समान स्थान आहे. लिहिणे आणि बोलणे या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी परस्पर पूरक ठरल्या. संस्थात्मक कामामुळे मला समाज जीवन जवळून पाहता आले.
संस्थात्मक कामात सर्वांना खूष ठेवणे अवघड असते. त्यामुळे टीका व अपमान सहन करून काम पुढे न्यावे लागते. उपहास, उपेक्षा, संघर्ष, समन्वय आणि मान्यता हे टप्पे अपरिहार्य असतात. ते पुढे म्हणाले, थोर व्यक्तींच्या सहवासामुळे मी समृद्ध होत गेला, त्यातूनच अभ्यासक वृत्ती वाढीस लागली. पालकांनी माझ्या मनात साहित्यविषयी प्रेम निर्माण करून सांस्कृतिक संचितच दिले. उत्तम शिक्षक लाभल्याने माझ्यात भाषा व साहित्याची आवड निर्माण झाली, असेही त्यांनी नमूद केले.
ॲड. अविनाश आव्हाड म्हणाले, वडिलांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाप्रमाणेच प्रा. मिलिंद जोशी यांचेही व्यक्तीमत्त्व विविध पैलूंनी परिपूर्ण आहे. त्यांची या पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सन्मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.
__________________________________________
जाहिरात