गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन !!
साहित्य, कला आणि संगीत कलांचा त्रिवेणी संगम
डॉ. प्रभा अत्रे लिखित ‘स्वरमयी’ आणि ‘सुस्वराली’ पुस्तकांचे होणार प्रकाशन !!
पुणे : स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्यकर्तृत्वावर केंद्रीत दोन दिवसीय महोत्सवाचे पुण्यात आयोजन करण्यात आले असून साहित्य, कला आणि संगीत यावर आधारित हा महोत्सव शनिवार, दि. 21 आणि रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
’स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष’ हा दोन दिवसीय महोत्सव बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.
शनिवार, दि. 21 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळात डॉ. प्रभा अत्रे लिखित ‘स्वरमयी’ आणि ‘सुस्वराली’ या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. प्रकाशन ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि ज्येष्ठ कवी, साहित्यिक, समीक्षक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
डॉ. प्रभा अत्रे यांनी संगीतविषयक केलेल्या लिखाणांचे संकलन असलेल्या ‘स्वरमयी’ या पाचव्या सुधारित आवृत्तीत स्वत:च्या संगीत साधनेचे तसेच गुरूंनी दिलेल्या तालमीचे चित्रण, गुरुस्थानी भेटलेल्या व्यक्ती, शिक्षणात संगीताचे स्थान तसेच एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून मैफलीबाहेर अनुभवलेले जग अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले आहे. या साहित्यकृतीस राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संगीतशास्त्र विषयक लेख असलेल्या ‘सुस्वराली’ या पुस्तकात संगीतनिर्मिती, त्याचे आकलन, समीक्षा, मैफलीची रचनातत्त्वे, संगीत शिक्षणातील अडचणी, संगीत कलेच्या संवर्धनाबाबत राष्ट्रीय धोरणे अशा अनेक विषयांवरील विवेचनाचा यात समावेश आहे. पुस्तकाची ही चौथी आवृत्ती आहे.डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेणारी चित्रफित या प्रसंगी दाखविली जाणार आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतीय संगीतविषयक केलेल्या व्याख्यांनाचा समावेश असलेल्या ‘आलोक’ या 19 भागांच्या दृकश्राव्य मालिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात येणार आहे.
डॉ. प्रभाताई अत्रे
पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. प्रभा अत्रे यांच्या प्रकाशित पुस्तकांमधील सांगीतिक लेखनाचे अभिवाचन आणि बंदिशींवर आधारित सांगीतिक सादरीकरण केले जाणार आहे. यात डॉ. केशवचैतन्य कुंटे, अभ्यासक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी तसेच डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य चेतना बनावत-पाठक व डॉ. अतिंद्र सरवडिकर यांचा सहभाग असणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 या वेळात डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचनांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात त्यांच्या शिष्या, प्रख्यात गायिका डॉ. उषा अत्रे-वाघ यांच्या कन्या डॉ. मनिषा रवी प्रकाश यांचे गायन होणार आहे. त्यानंतर कोलकाता येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पियु मुखर्जी यांचे गायन होणार असून कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बंगळुरू येथील नृत्यगुरू वैजयंती काशी यांचे डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर आधारित कुचिपुडी नृत्य सादरीकरण होणार आहे.
कलाकारांना माधव मोडक, पांडुरंग मुखडे (तबला), सुयोग कुंडलकर, लीलाधर चक्रदेव (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
__________________________________________
जाहिरात