गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सहजीवन गणेश मंडळाच्या मंचावर ‘लावणी भुलली अभंगाला’ !!
पंडित शौनक अभिषेकी यांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद !
पुणे : सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात पंडित शौनक अभिषेकी यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांना, नाट्यगीतांना तसेच भरत नाट्य मंदिराची निर्मिती असलेल्या ‘लावणी भुलली अभंगाला’ या संगीत नाटकाच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त आणि भरभरून दाद दिली.
सहकार नगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाला बहारदार रसिकांच्या उदंड प्रतिसादात कार्यक्रमांनी सुरुवात झाली आहे. महोत्सवाचे यंदाचे 51वे वर्ष आहे.
सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात गायन करताना पंडित शौनक अभिषेकी.
उपस्थितांशी संवाद साधताना पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, सहजीवन मंडळाच्या कार्यात ज्येष्ठांसह तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसतो आहे हे कौतुकास्पद आहे. महोत्सवातील कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध कलाकारांचा सहभाग असणे ही सुद्धा आनंदाची बाब आहे. पंडित अतुलकुमार उपाध्ये हे सहकार नगरचे वैभव आहे.
पंडित शौनक अभिषेकी यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने केली. त्यानंतर उस्ताद बडे गुलामअली खाँ सादर करीत असलेली ‘महादेव देव महेश्वर’ ही शिवस्तुती सादर केली.
‘लागी कलेजवा कटार’, ‘सुहास्य तुझे मनासी मोही’, ‘नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी’, ‘काटा रुते कुणाला’ या रचनांबरोबरच संत तुकाराम, रामदास स्वामी यांच्याही रचना त्यांनी सादर केल्या. ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘अबिर गुलाल उधळीत रंग’ या लोकप्रिय रचनांची मैफलीची सांगता केली. सुभाष कामत (तबला), माधव लिमये (संवादिनी), अभेद अभिषेकी, राज शहा (सहगायन), पंढरी दरेकर (पखवाज), अतुल गरुड (टाळ) यांनी साथसंगत केली.
सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेल्या ‘लावणी भुलली अभंगाला’ संगीत नाटकातील एक प्रसंग.
सांस्कृतिक महोत्सवात रसिकांनी ‘लावणी भुलली अभंगाला’ या संगीत नाटकाचाही आनंद घेतला. गणेश मंडळाच्या मंचावर संगीत नाटक सादर होण्याची ही पहिलीच घटना.
भरत नाट्य संशोधन मंडळाची निर्मिती असलेल्या या नाटकात अभय जबडे, विश्वास पांगारकर, सुधीर फडतरे, कौशिक कुलकर्णी, चारुलता पाटणकर, कौस्तुभ परांजपे, वज्रांग आफळे, अनुष्का आपटे यांच्या भूमिका आहेत. रवींद्र खरे यांचे दिग्दर्शन होते. तर हिमांशु जोशी (ऑर्गन), दीप वैद्य (तबला), मुकुंद कोंडे-देशमुख (ढोलकी), स्वप्निल कुंभार (तालवाद्य) यांनी साथंगत केली. लावणी श्रेष्ठ की अभंग असा सुरेल सामना रसिकांना अनुभवायला मिळाला.
कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यपदांना रसिकांनी भरभरुन दाद दिली.
मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, शिल्पकार विवेक खटावकर, प्रविण शिरसे, मिलिंद खंडेलवाल, राजेश दातार, सुनील माळी, डॉ. लक्ष्मी माळी यांच्या हस्ते कलाकार तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
__________________________________________
जाहिरात