गोल्डन आय न्यूज नेटवर्क
लोककलांमधून रसिकांनी अनुभवले मायबोलीचे लळित !
सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात डॉ. भावार्थ देखणे आणि परिवाराचे सादरीकरण !!
पुणे : जात्यावरची ओवी, पाळणा, धावा, वासुदेव, जोशी, भारुड, भजन, गण, गवळण, जागरण, गोंधळ या अभिजात, पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून रसिकांनी मायबोलीचे लळित अनुभवले. महाराष्ट्र ज्या संत आणि लोकपरंपरेने घडला त्यातील लोककलांचे दर्शन रंजक किस्से आणि सादरीकरणातून झाले. निमित्त होते सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे.
सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ‘साहित्यातील लोकरंग’ कार्यक्रमात सहभागी गोरज देखणे, डॉ. पूजा देखणे, डॉ. भावार्थ देखणे.
सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाला बहारदार कार्यक्रमांनी आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात सुरुवात झाली आहे. महोत्सवाचे यंदाचे 51वे वर्ष आहे. या महोत्वसातंर्गत डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठान प्रस्तुत ’साहित्यातील लोकरंग’ हा कार्यक्रम डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे, गोरज देखणे यांनी सादर केला. प्रसन्न भुरे (तबला, ढोलकी), ऋषिकेश पुजारी (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. सादरीकरणात टाळ, चिपळ्या, दिमडी व संबळ या पारंपरिक वाद्यांचाही समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात ‘सुंदर माझं जातं गं’ या संत जनाबाईंच्या पारंपरिक ओवीने करताना कलाकारांनी अनोखे भावदर्शन घडविले.
प्रत्येक लोककलेची अभ्यासपूर्ण माहिती देत डॉ. पूजा देखणे यांनी कार्यक्रमात रंग भरले. ‘निज गडे लडिवाळा, निज निज रे माझ्या बाळा’ हा पाळणा सादर करताना डॉ. भावार्थ देखणे यांनी त्यामधील रूपक उलगडून दाखविले.
धावा हा पारंपरिक प्रकारही डॉ. भावार्थ यांनी प्रभावीपणे सादर केला तर आपल्या कवनांतून जनजागृती करणारा वासुदेव दर्शविताना श्रीविद्येचा टोप डोक्यावर चढविलेला, हाताला दान देण्याची सवय व्हावी म्हणून दान मागणारा वासुदेव जणू समोर उभा ठाकला.
जोशी, भारुड, भजन अशा लोककला प्रकारातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. अवघ्या नऊ वर्षांच्या गोरज देखणे याने ‘आदि गणाला रणी आणिला’ हा गण अतिशय लडिवाळपणे सादर केला. त्याच्या सादरीकरणाला रसिकांनी विशेष कौतुकाने दाद दिली. गवळण म्हणजे लीलाधारी, क्षत्रिय आणि तत्त्वज्ञ कृष्णाचे मनोहारी दर्शन असे रूपक उलगडून डॉ. भावार्थ देखणे यांनी ‘कशी वाजविली मुरली’ ही गवळण सादर केली. डॉ. पूजा देखणे यांनी लोककलांच्या माध्यमातून महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली हे रसाळ विवेचनातून विशद केले.
लावणी, तमाशा, वग याविषयी डॉ. पूजा देखणे यांनी सविस्तर माहिती दिली. त्याला अनुसरून डॉ. भावार्थ देखणे यांनी पठ्ठे बापूराव, रामजोशी आणि अण्णा भाऊ साठे यांच्या रचना सादर करून रसिकांना मोहित केले. पारंपरिक जागरण-गोंधळ सादर करताना डॉ. भावार्थ यांनी दिमडी आणि संबळ वादनही केले.
कार्यक्रमाची सांगता डॉ. भावार्थ यांनी वसंत बापट यांनी लिहिलेला पिराजी रामजी सरनाईक यांच्या परंपरेतील ‘राज्य मराठी नागपुराहून गोव्यापर्यंत’ या पोवाड्याने केली. मराठमोळा लोकरंग अनुभवत रसिकांनी या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
कलाकारांचा सन्मान सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, महोत्सवाचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, प्रसिद्ध गायक पंडित राजेश दातार, नितिश गोगटे, अमर जबडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्वय बेंद्रे यांनी केले.
__________________________________________
जाहिरात