गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विज्ञानकथांची निर्मिती झाल्यास विद्यार्थी विज्ञानसाक्षर घडतील : डॉ. राजा दीक्षित !!
बालसाहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे : डॉ. राजा दीक्षित !
इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्काराने डॉ. संजय ढोले, फारुक काझी, चंद्रमोहन कुलकर्णी यांचा गौरव !!
पुणे : बालसाहित्य हे शहरी भागापुरते मर्यादित राहता कामा नये. ज्ञानाचे लोकशाहीकरण होत बालसाहित्य आदिवासी पाड्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष व संपादक डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केली. नव ज्ञान-विज्ञानकथांची निर्मिती झाल्यास मुले विज्ञानसाक्षर होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कार वितरण समारंभ आज (दि. 29) सोमवार पेठेतील दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. पुरस्काराचे वितरण डॉ. दीक्षित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजीव ब्रह्मे, व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड, डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनचे कार्यक्रम संयोजक प्रसाद भडसावळे व्यासपीठावर होते. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. उपस्थित होत्या.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) निलेश गायकवाड, संजीव ब्रह्मे, फारुक काझी, डॉ. राजा दीक्षित, डॉ. संजय ढोले, मिलिंद परांजपे, प्रसाद भडसावळे.
संस्थेच्या 97व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन, ठाणे येथील प्रकाशन संस्था व्यास क्रिएशन्स व दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
2023 साली प्रसिद्ध झालेल्या डॉ. संजय ढोले यांच्या ‘राफिणू’ या किशोर-कुमारवयीन गटासाठी लिहिलेल्या कादंबरीला रुपये पाच हजार, फारुक काझी यांच्या ‘जादूई दरवाजे’ या बाल साहित्यास रुपये तीन हजार तर माधुरी पुरंदरे लिखित ‘कुमार स्वर एक गंधर्व कथा’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच पुस्तकातील चित्रांसाठी चंद्रमोहन कुलकर्णी यांना दोन हजार रुपयांचा पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
चंद्रमोहन कुलकर्णी यांचा पुरस्कार प्रकाशक मिलिंद परांजपे यांनी स्वीकारला.2इंदिरा अत्रे यांच्या दहा बालसाहित्यकृतींच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, मराठीतील बाल साहित्य अनुवादरूपाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचल्यास या क्षेत्रात नवीन युगाला सुरुवात होईल. हे नवयुग फार दूर नाही, त्याच्या स्वागताला आपण तयार राहू. प्रभाताई अत्रे या केवळ गायिक नव्हत्या तर त्या उत्तम अभ्यासक, लेखिका आणि प्रतिभावंत व्यक्ती होत्या. त्यांचे संस्थात्मक कार्यदेखील महान आहे. बालसाहित्याच्या समृद्धीसाठी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमाविषयी डॉ. दीक्षित यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.
स्वागतपर प्रास्ताविकात पुरस्कारविषयी बोलताना प्रसाद भडसावळे म्हणाले, बालसाहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट साहित्याला डॉ. प्रभा अत्रे यांच्या इच्छेनुसार बालसाहित्यकार इंदिरा अत्रे यांच्या नावे गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.डॉ. संजय ढोले म्हणाले, शालेय स्तरावर विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करीत असताना विद्यार्थ्यांसाठी विज्ञान-कथा निर्माण होण्याची गरज असल्याचे लक्षात आल्याने किशोर-कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी विज्ञानकथा लेखन सुरू केले.
मुलांसाठी लिहिताना त्यांची मानसिकता ओळखून नाविन्यता आणि उत्सुकता निर्माण करणारे तचेस संक्षिप्त लिखाण व्हावे, असे त्यांनी नमूद केले.
वाचक लेखनाकडे कशा पद्धतीने पाहतो याविषयी सांगून फारुक काझी म्हणाले, मुलांसाठी साहित्यकृती निर्माण करताना त्याकडे मुलांच्या नजरेतूनच पाहणे आवश्यक असते. माझ्या लिखाणाचे पहिले श्रोते हे माझे विद्यार्थींच असतात. बाल साहित्य हे संगीताच्या लयीसारखे, चित्रकलेच्या फटकाऱ्यासारखे असते ज्यात प्रवाहीपणा असतो, असेही ते म्हणाले.
चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मनोगत मिलिंद परांजपे यांनी वाचून दाखविले. त्यात म्हटले आहे की, मुले हा समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक असल्याचे जाणवते. कला आणि नागरिकशास्त्र या विषयांना दुय्यम स्थान दिले जात असून कला क्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. चांगले नागरिक घडण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना संवेदनशीलतेने योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
मान्यवरांचे स्वागत निलेश गायकवाड, संजीव ब्रह्मे यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा डोळे यांनी केले तर आभार निलेश गायकवाड यांनी मानले.
_________________________________________
जाहिरात