गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना..’ !!
कै. माणिक बजाज यांना सुहृदांची सांगीतिक मानवंदना !
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि कै. माणिक बजाज मित्र परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन !
पुणे : ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून पुण्याची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ॲकॉर्डिअन वादक आणि गायक माणिक बजाज यांच्या आठवणींना उजाळा देत पुण्यातील ऑर्केस्ट्रा जगतातील गायक-वादकांनी त्यांना स्वरसुमनांजली वाहिली.
सांगीतिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविणारे माणिक बजाज यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि कै. माणिक बजाज मित्र परिवारातर्फे त्यांना सांगीतिक मानवंदना देण्यासाठी पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेलडी मेकर्सचे अशोककुमार सराफ, दरबार ब्रास बँडचे इकबाल दरबार, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, एस. जे. एम. एफ. पुणे ब्रँचचे राजन बेडके, अनिल गोडे, सुहासचंद्र कुलकर्णी, जयंत जोशी, अनिलकुमार घाडगे, बाबा शिंदे, विजय केळकर, संदीप पंचवाटकर, प्रदीप बकरे, प्रसाद केळकर, उदय बराटे, प्रविण शेळके, संजय डोलारे, संजय मरळ, श्रीकांत फडके, अजय जगदाळे, पॉल अँथनी, मयूर पांडे यांची विशेष उपस्थिती होती.
माणिक बजाज यांच्या स्मृतींना उजाळा देत किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती सांगितली.
प्रा. सुहासचंद्र कुलकर्णी म्हणाले, माणिकजी संगीत क्षेत्राकडे वेगळ्या दृष्टीने पाहत असत. त्यांनी कायम दुसऱ्यांचे भले चिंतले. त्यातूनच सहकलाकारांना योग्य तो मार्गही दाखविला.
अशोककुमार सराफ म्हणाले, घरचा व्यवसाय सोडून माणिकजी संगीत क्षेत्राकडे वळले. त्यांनी कायमच गरीब कलाकारांना मदत केली. ते यारोंका यार होते. राजन बेडके व बाबा शिंदे यांनी माणिक बजाज यांच्या बरोबर असलेले स्नेहबंध उलगडून दाखविले.
गायक, निवेदक संदीप पंचवाटकर म्हणाले, माणिकजींनी सहकलाकारांना अनेक व्यावसायिक सूत्रे शिकविली. संवाद साधण्याची त्यांची हातोटी होती. व्यवसायातील यशाचे गमक उलगडल्याने त्यांनी त्यांच्या व्यवसायात उंच भरारी घेतली. ते हळव्या मनाचे कलाकार होते. हृदयाला भिडणारी गीते त्यांना आवडत असत.डॉ. मिलिंद भोई यांनी माणिकजींच्या आठवणींना उजाळा देत आपण त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानले होते, असे सांगितले.
इकबाल दरबार यांनी माणिकजींच्या कार्याचे कौतुक करून माणिकजींचे जाणे आपल्याला ‘आधाअधुरा’ करून गेले, असे सांगून त्यांच्यातील मैत्रीचे नाते उलगडले.
‘क्या खबर क्या पता’, ‘जीवनसे भरी तेरी आँखे’, ‘गीत गाता हूं मै’, ‘किसका रस्ता देखे..’, ‘जाने वो कैसे लोग थे’, ‘घुंगरू की तऱ्हा बजताही रहा’, ‘जिंदगी कैसी है पहेली’, ‘मेरे मेहबूब’, ‘जिंदगीका सफर’ आदी गीते कलाकारांनी या प्रसंगी सादर केली. माणिक बजाज यांनी गायलेल्या ‘मुसाफिर हुं यारो’ या गाण्याची चित्रफित दाखवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे निवेदन जयंत जोशी यांनी केले तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते.
_________,_________________________________
जाहिरात