गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा गायन, वादन, नृत्यातून देशभक्तीचा जागर !!
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे व बाबुराव पुसाळकर संगीत गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गांधर्व महाविद्यालय, पुणेमधील सुमारे 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ‘वंद्य वंदे मातरम्’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला.
‘मेरे भारत तुझसे रोशन’, ‘ऐ मेरे वतन आबाद रहे तू’, ‘छोडो कल की बाते’, ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘अनादि मी अनंत मी’ यासह विविध देशभक्तीपर गीते सादर करून राष्ट्रभावना जागविली.गायन, वादन आणि नृत्याचा मिलाफ असलेला असा हा अनोखा कार्यक्रम सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला ज्येष्ठ व्यावसायिक वैशाली गाडगीळ, भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र आपटे, कोषाध्यक्ष डॉ. मोहन उचगावकर, गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणीता मराठे, नरेंद्र चिपळूणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
गांधर्व महाविद्यालय, पुणे व बाबुराव पुसाळकर संगीत गुरुकुल आयोजित ‘वंद्य वंदे मातरम्’ कार्यक्रमात देशभक्तीपर गीत सादर करताना गांधर्व महाविद्यालय, पुणेचे विद्यार्थी.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या ‘जय जगदीश हरे’ या प्रार्थनेने झाली. ‘स्वतंत्रतेचा जयजयकार’, ‘वंद्य वंदे मातरम्’, ‘ऐ मेरे प्यारे वतन’, ‘बलसागर भारत होवो’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ आदी गीते या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केली. कीर्ती कस्तुरे, प्रफुल सोनकांबळे, सन्मिता शिंदे, मिताली साटोनकर, विष्णु धनगरे, अश्विन कुलकर्णी, नरेंद्र चिपळूणकर, विनय कोहाड या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी तसेच गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली.
‘ओ जन्मभूमी ओ मातृभूमी’ या देशभक्तीपर गीतावर विभावरी परचुरे, सृष्टी मराठे, वैष्णवी पवळे यांच्या विद्यार्थिनींनी कथक तर ‘भारत अनोखा राग है’ या गाण्यावर धनश्री मोघे यांच्या शिष्यांनी भरतनाट्यम् नृत्य सादरीकरण केले. पंडित विनायकराव पटवर्धन यांच्या आवाजातील मिश्र काफी रागातील ‘वंदेमारतम्’ ऐकवून कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रसन्न भुरे, अनुज काळे, रुद्रा, नचिकेत चल्लावार, विश्वनाथ गोसावी, वंशराज वरखडे, मयुरेश गाडगीळ, शौर्य पायगुडे, प्राज्ञा गोळविलकर, निनाद काजळे, अनिल आघाव, नायायणी लोहार, माही पटवर्धन, सुमित जोशी, श्लोक चौधरी, हर्षवर्धन भगत, नंदिता सहस्त्रबुद्धे, संगमेश्वर तडलगी आदींनी साथसंगत केली.
वैशाली गाडगीळ गांधर्व महाविलयाच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, अभ्यासाबरोबर एखादी कला जोपासल्यास त्याचा आयुष्याच्या वाटचालीत नक्कीच उपयोग होतो, एकाग्रता वाढते.
प्रास्ताविकात प्राचार्य पंडित प्रमोद मराठे म्हणाले, अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने शिक्षकांची मेहनत दिसून येत आणि विद्यार्थ्यांची पारख करता येते. सूत्रसंचालन वैष्णवी पवळे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अरुण गवई यांचे होते.
_____________________,_____________________
जाहिरात