गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गायन सेवेतून शिष्यांनी केली गुरुसेवा !
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि नादरूप संगीत सभा यांच्यातर्फे गायन मैफल !!
पुणे : ललत रागातील ‘रैन का सपना’, गौड सारंगमधील ‘कजरा रे गोरी तुमरे नयना सलोने मदभरे’ तसेच पुरिया धनाश्री रागातील ‘सदारंग नित उठ कर देत दुहाई’ तर राग नंदमधील ‘बारे सैंया’ अशा सुरेल बंदिशींचा रसिकांनी आस्वाद घेतला.
निमित्त होते ते शिष्यांनी गायनाच्या सादरीकरणातून केलेल्या गुरुसेवेचे. गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि नादरूप संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या मैफलीत
सकाळच्या सत्रात प्रद्युम्न नाडगौडा याने ललत रागातील द्रुत लयीतील ‘सदारंग अदारंग तानरंग मनरंग सबरंग रचनाकार को प्रणाम’, मुग्धा लेले यांनी गौड सारंगमधील ‘पियू पलन लागे मोरी आखियाँ’ ही द्रुत लयीतील बंदिश सादर केली.
तसेच विनय कोहाड यांनी अल्हैया बिलावल रागातील ‘दैय्या कहाँ गेलो’ ही ताल तिलवाडातील बंदिश तर द्रुत लयीतील ‘कवन बटरिया गैलो माई’ ही रचना सादर केली. कन्हैया भोसले यांनी राग जौनपुरीमधील ‘बाजे झननन बाजे मोरे पायलिया’, द्रुत लयीतील ‘छुम छननन बाजे बिछुआँ’ या बंदिशींचे प्रभावी सादरीकरण केले.
सायंकालीन सत्रात अथर्व अभयार्पिता यांनी पुरिया धनाश्रीतील ‘पायलिया झनकारे मोरी’ ही द्रुत लयीतील बंदिश सादर केली. डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी गौडमल्हार रागातील ‘रैना काहे तुम हमसो’ आणि ‘बिजलिया चमकन लागी’ या रचना प्रभावीपणे सादर केल्या.
जयंत केजकर यांनी सूरमल्हार रागातील ‘गरजत आए बादल कारे’ तर द्रुत लयीतील ‘बदरवा बरसन को आए’ या रचना सादर केल्या त्याला रसिकांनी विशेष दाद दिली. यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मधुवंती देव यांनी नंद रागातील ‘बारे सैंया’ ही पारंपरिक बंदिश तसेच त्याला जोडून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांची मध्यलय एकतालातील ‘आजा रे बालमवा’ ही रचना सादर केली. अलका देव-मारुलकर यांची ‘रंग रसिया आयी सावन की बहार’ या कजरीने मधुवंती देव यांनी मैफलीची सांगता केली. देव यांच्या गायनसेवेला रसिकांनी भरभरुन दाद दिली.
पं. प्रमोद मराठे, अमेय बिच्चू, श्रीपाद शिरवळकर, सौरभ क्षीरसागर, निलय सालवी यांनी समर्पक साथसंगत केली. चैतन्य लिमये, ओम बादाडे, प्राजक्ता ठकार, देवयानी केसरकर यांनी तानपुरा साथ केली.
गायनगुरू जयंत केजकर मैफलीविषयी म्हणाले, गुरूंनी दिलेले ज्ञान शिष्याने सादरीकरणातून गुरूंसमोर मांडणे ही गुरुसेवाच आहे. याच हेतूने या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे निवेदन जयंत केजकर आणि डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी केले. कलाकारांचा सन्मान डॉ. प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
_________________________________________
जाहिरात