गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्रीमद् भागवताच्या मराठीतील ओव्यांमध्ये गेयता आणि प्रासादिकता : पद्माकर कुंडीकर महाराज !
श्रीमद् भागवताच्या गणेशदास लिखित मराठीतील ओवीबद्ध रचनांच्या पुस्तकाचे प्रकाशन !
पुणे : श्रीमद् भागवत हा ग्रंथ विद्वनांची परीक्षा घेणारा आहे. श्रीमद् भागवत समजण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास आणि भगवंताची कृपा असावी लागते. श्री गणेशदास यांच्यावर गुरुकृपा आणि त्यांच्याकडे शब्दशक्ती असल्याने तसेच त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यामुळेच हा ग्रंथ ओवीबद्ध करणे शक्य झाले आहे. मराठीतील प्रत्येक ओवीमध्ये गेयता, प्रासादिकता आहे, असे गौरवोद्गार भागवत विद्यापीठाचे कुलगुरू पद्माकर कुंडीकर महाराज यांनी काढले.
श्री गणेशदास (भूषण श्रीपाद घाटपांडे) लिखित श्रीमद् भागवत या मराठी ओवीबद्ध रचनांच्या पुस्तकाचे प्रकाशन गोकुळअष्टमीचा मुहूर्त साधून सोमवारी (दि. 26) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कुंडीकर महाराज अध्यक्षपदावरून बोलत होते. संवाद, पुणे, स्वानंद क्रिएशन्स आयोजित कार्यक्रम मयूर कॉलनीतील म. ए. सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
श्री वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त शरद शास्त्री जोशी, श्रीरामकथाकार रवींद्र पाठक, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री गणेशदास (भूषण श्रीपाद घाटपांडे) यांच्यासह संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, स्वानंद क्रिएशन्सचे संजय भंडारे मंचावर होते.
श्रीमद् भागवत या मराठी ओवीबद्ध रचनांच्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) संजय भंडारे, शरद शास्त्री जोशी, श्री गणेशदास, पद्माकर कुंडीकर महाराज, डॉ. पी. डी. पाटील, प्रवीण दीक्षित, रवींद्र पाठक, सुनील महाजन.
कुंडीकर महाराज पुढे म्हणाले, श्री गणेशदास यांच्या लिखाणात नाविन्यता आहे. त्यांच्यावर सरस्वती माता प्रसन्न असल्याने त्यांच्या हातून मराठीतील ओवीबद्ध ग्रंथ साकारला आहे.डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, जन्माष्टमीचा योग साधून ग्रंथाचे प्रकाशन होत आहे ही परमेश्वराचीच कृपा आहे. महाराष्ट्रातील भाविकांना त्यांनी मराठीत ओवीबद्ध भागवत कथा दिली आहे. ग्रंथातील ओव्यांचे वाचन करून मनाला नक्कीच शांतता लाभेल.
भागवत या शब्दांची फोड सांगून शरद शास्त्री जोशी म्हणाले, श्री गणेशदास सोप्या भाषेत ग्रंथ साकारू शकले ही त्यांच्यावर परमेश्वराची महान कृपाच आहे. या महान पवित्र ग्रंथांचे कृष्णभक्तांनी आकंठ प्राशन करावे.
प्रवीण दीक्षित म्हणाले, मानसिक विकार दूर करण्याचे सामर्थ्य या भागवत ग्रंथात आहे. समाजात उद्वेग निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना भागवताचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यातून जीवनात आनंद निर्माण होईल.
रवींद्र पाठक म्हणाले, ओवीबद्ध ग्रंथाने मराठीतील आध्यात्मिक वाङ्मयात मोठी भर पडली आहे. श्री गणेशदास यांच्या हातून भगीरथ कार्य घडले आहे.
श्री गणेशदास यांनी ग्रंथाची निर्मिती कशी झाली याविषयी प्रास्ताविकात विवेचन केले. या ग्रंथामुळे माणूसपण मिळाले, प्रत्येकात श्रीकृष्ण बघायची दृष्टी मिळाली असेही त्यांनी आवजूर्न सांगितले. संजय भंडारे यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत श्री गणेशदास आणि संजय भंडारे यांनी केले. ग्रंथनिर्मितीत योगदान देणाऱ्या सुहृदांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
_________________________________________
जाहिरात