गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ही तृष्णा अपूर्णतेची, मी जगते कवितेसाठी..!
रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे सुप्रिया पुरोहित-हळबे यांचा काव्यकिरण पुरस्काराने गौरव
पुणे : जेंव्हा मी माझी नसते, मी असते कविसेसाठी
भावना बोलक्या होती, मी नसते कोणासाठी
हा आवेग झेलताना, का डोळा येते पाणी
ही तृष्णा अपूर्णतेची, मी जगते कवितेसाठी
असे काव्यरूपी मनोगत वक्त करीत आयुष्यात जेव्हा पूर्णत्वाची भावना येते तेव्हा सगळे थांबले आहे असे वाटते. पण काव्य लिखाणातील अपूर्णतेची तृष्णा कायम असावी अशा सदिच्छा पाठीशी असाव्यात, असे प्रतिपादन कवयित्री सुप्रिया पुरोहित-हळबे यांनी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या काव्यकिरण पुरस्काराने कवयित्री सुप्रिया पुरोहित-हळबे (ठाणे-मुंबई) यांचा रविवारी (दि. 25) सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान आयोजित काव्यकिरण पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, सुप्रिया पुरोहित-हळबे, भूषण कटककर.
प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत काव्य, साहित्याच्या क्षेत्रात मोलाची भरीव कामगिरी करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविले जात असल्याचे सांगितले.
पुरस्कारामागील भूमिका विशद करताना करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर म्हणाले, काव्यक्षेत्रात सकल लिखाण करणाऱ्या कवी-कवयित्रींचा पुरस्कार देऊन गौरविले जाते.
विद्येच्या माहेरघरात पुरस्कार मिळत असल्याने भाग्यशाली आहे, असे सांगून सुप्रिया पुरोहित-हळबे म्हणाल्या, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही तर माझ्या शब्दांचा, कवितांचा आहे. त्या पुढे म्हणाल्या, मी पुरस्कारासाठी लिहिले नाही तर मनात ज्या भावना, तरंग उमटत गेले ते काव्यातून मांडत गेले. प्रामाणिकपणे केलेल्या लिखाणाचे हे फळ आहे. या यशात कुटुंबियांचा आणि सुहृदांचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानाच्या कार्याचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला.
हळबे यांचा परिचय मुक्ता भुजबले यांनी करून दिला तर मानपत्राचे वाचन निरुपमा महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, प्राजक्ता वेदपाठक, वासंती वैद्य, नचिकेत जोशी, ऋचा कर्वे, स्वाती यादव, चैतन्य कुलकर्णी, योगेश काळे, उर्मिला वाणी, राजश्री सोले, स्वाती दाढे, स्वप्नील पोरे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
__________________________________________
जाहिरात