सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात !!
51व्या वर्षानिमित्त रसिकांना गायन, वादन, नृत्याच्या कार्यक्रमांची पर्वणी !!
पुणे : सहकारनगरमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाला बहारदार कार्यक्रमांनी आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादात सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाचे यंदाचे 51वे वर्ष असून महिनाभर रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
सहकारनगर नं. 2 मधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टच्या आवारात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, महोत्सवाचे अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. देशभक्तीपर गीते तसेच सैनिकांच्या परिवारातील कुटुंबियांच्या सत्काराने महोत्सवाची सुरुवात झाली. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या गंगाधर संगीत महोत्सवात शर्वरी जेमनिस आणि निखिल फाटक यांच्या ‘कपल ऑफ मेनी थिंक्स’ हा आगळावेगळा कार्यक्रम सादर झाला. ताल, नृत्य आणि कवितांची सांगड घालणारा असा हा कार्यक्रम रसिकांना भावला.
गंगाधर महोत्सवात शर्वरी जेमनिस आणि निखिल फाटक ‘कपल ऑफ मेनी थिंक्स’ कार्यक्रम सादर करताना.
गंगाधर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी) प्रसिद्ध गायक अमोल निसाळ व प्रसिद्ध बासरीवादक अमर ओक यांनी गायन-वादन असा फ्युजन कार्यक्रम सादर केला.
मंगळवारी (दि. 27) दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून बुधवारी (दि. 28) सायंकाळी 5:30 वाजता ह.भ.प. भावार्थ देखणे भारुड सादर करणार आहेत. दि. 29 व दि. 30 रोजी गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शनिवार, दि. 31 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन होणार आहे.
दि. 1 सप्टेंबर रोजी आरेग्य शिबिर होणार असून सायंकाळी 5:30 वाजता भरत नाट्य मंदिर प्रस्तुत लावणी भुलली अभंगाला या संगीत नाटकाचा प्रयोग होणार आहे. दि. 2 व दि. 3 रोजी विनायक महाराज कीर्तनसेवा सादर करणार आहेत. दि. 4 रोजी उमा नेने यांचे गायन, दि. 7 रोजी श्रींची प्रतिष्ठापना, दि. 8 रोजी क्रीडा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सायंकाळी 7 वाजता माधुरी आपटे यांच्या कथक नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तालवाद्यांचे विविध रंग उलगडून दाखविणारा ताल परिक्रमा हा कार्यक्रम समीर सूर्यवंशी दि. 12 रोजी सादर करणार आहेत. दि. 14 ला विविध गुणदर्शन, दि. 15 ला रांगोळी स्पर्धा तर सायंकाळी 5:30 वाजता नमस्ते बॉलीवूड हा कार्यक्रम राधा मंगेशकर आणि राजेश दातार सादर करणार आहेत.
दि. 13 रोजी 21 मान्यवर गायकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनंत वेरेकर, मदन कटारिया आणि सहकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.
__________________________________________
जाहिरात