गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रसिक विठ्ठल रंगी रंगले..!
संतवाणीद्वारे पंडित संजय गरुड यांची गुरुचरणी गायनसेवा रुजू !!
पुणे : ‘माझे माहेर पंढरी’, ‘इंद्रायणी काठी’, ‘पंढरी निवासा सख्या पांडुरंगा’ अशा विविध संतरचना पंडित संजय गरुड यांनी सादर करून गुरुचरणी गायनसेवा रुजू केली. संतवाणीद्वारे पंडित गरुड यांनी अबालवृद्धांना पंढरीची वारी घडवून विठ्ठलाचे मनोहारी रूप दाखविले.
निमित्त होते ब्रह्मनाद कला मंडळ व ब्रह्मनाद संगीत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे. नवी पेठेतील एस. एम. जोशी, सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संतवाणी सादर करताना पं. संजय गरुड
सुरुवातीस उद्योजक सुभाष चाफळकर, ह. भ. प. विजय जगताप, माजी कामगार आयुक्त पनवेलकर, उद्योजक हरेंद्र वाजपेयी, पंडित संजय गरुड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन तसेच पंडित श्रीकांत देशपांडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या नंतर ब्रह्मनाद संगीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शारदास्तवन व गुरुवंदना सादर केली. याचे संयोजन निषाद गरुड याचे होते. ब्रह्मनाद संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून किराणा घराण्याचा वारसा पंडित संजय गरुड आणि रागिणी गरुड यांच्या माध्यमातून समर्थपणे पुढे नेला जात असल्याचे विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून जाणवले.
पंडित गरुड यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘अलंकापुरी पुण्यभूमी प्रवित्र’ हा श्लोक व रामकृष्ण हरीच्या गजराने केली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत कान्होपात्रा यांच्या भक्तीरचना सादर केल्या. ‘रूप पाहता लोचनी’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, ‘अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा’, ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या भक्तीरचना भावपूर्ण पद्धतीने सादर करून रसिकांना भक्तीरसात चिंब केले. ‘बाजे मुरलिया बाजे रे’ या कृष्ण भजनाने कृष्णलिलांचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाची सांगता भगवंत नामाच्या स्तुतीने परिपूर्ण अशा ‘आगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने केली. संपूर्ण कार्यक्रमात रसिकांनी पंडित गरुड यांना टाळ्यांची दाद देत व भगवंताचे नाम घेत साथ केली. प्रत्येक संतरचनेचे भावपूर्ण विवेचन ह. भ. प. विजय जगताप यांनी करताना रचनांमधील गुह्य उलगडत नेले.
तुषार केळकर (संवादिनी), रोहन पंढरपूरकर (तबला), माऊली फाटक (पखवाज), अविराज मिले (टाळ), ज्योती ताठे, दिनेश माझिरे (तानपुरा, सहगायन), निषाद गरुड (सहगायन) यांनी समर्पक साथ केली. कलाकार व मान्यवरांचा सत्कार सुभाष चाफळकर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागिणी गरुड यांचे होते.
जाहिरात