गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दिल्लीत संमेलन; मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !
जेएनयूतील मराठी भाषा अध्यासन आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू !!
सरहद आयोजित 98व्या मराठी साहित्य संमेलनाचा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कार्यारंभ !!
पुणे : दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचा विषय आहे. मराठी भाषेचा उत्सव सुमारे 70 वर्षांनंतर दिल्लीत होत आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेसह मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यास नहार व त्यांचे सहकारी यशस्वी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ दीपप्रज्वलन करून करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समवेत संजय नहार, विनोद कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मिलिंज जोशी, सुनीताराजे पवार
दिल्लीतील जेएनयू येथे कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी भाषेचे अध्यासन व्हावे यासाठी तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ शनिवारी (दि. 17) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी मंचावर होते.
त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस यांची तसेच प्रा. राजा दीक्षित आणि साहित्य परिषदेषच्या पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचा कार्यारंभ झाला.
शिंदे पुढे म्हणाले, साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत येण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. वास्तू लहान असली तरी या वास्तूची कीर्ती मोठी आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, विद्येच्या माहेरघरातून सत्तेच्या राजधानीत संमेलनाच्या निमित्ताने मायमराठीचा डंका वाजणार आहे. संमेलन ऐतिहासिक होईल, यात शंका नाही. मराठी भाषेचा सोहळा राष्ट्रीय पातळीवर जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. दिल्लीत होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य जगासमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिंदे पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही सर्वांचीच भावना आणि तळमळ आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नाचे माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी बोलताना दिली.
संजय नहार म्हणाले, मराठी माणसाचा आवाज दिल्लीतून सर्वदूर घुमला पाहिजे यासाठी दिल्लीत संमेलन व्हावे, अशी मराठीजनांची इच्छा आहे. जेएनयू येथे मराठी भाषेचे अध्यासन व्हावे यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एक कोटींची देणगी जाहीर केली होती. अध्यासनाठी निधी मिळाल्यास अध्यासन सुरू करण्यास मदत होईल, अशी विनंती नहार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. राजकीय व्यक्तींच्या भेटी घेतल्या, धरणे आंदोलन केले. लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी विनंती आहे. यासाठी पुढाकार घ्यावा, पंतप्रधान यांना भेटून अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रोत्साहन कसे मिळेल यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रा. उषा तांबे यांनी संमेलनाची स्थळ निवड प्रक्रिया कशी असते याविषयी माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत संजय नहार, प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश वाडेकर यांनी केले तर आभार सुनीताराजे पवार यांनी मानले.
जाहिरात