गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ह. भ. प. जानकीराम जगताप लिखित ‘तालचक्र’चे शुक्रवारी प्रकाशन !!
पं. संजय गरुड यांचे गायन तर सत्यजित तळवलकर यांचे एकल तबलावादन ऐकण्याची संधी !
पुणे : ह. भ. प. जानकीराम जगताप लिखित ‘तालचक्र’ या तबलाविषयक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल आवार, टिळक रोड येथे होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते होणार असून ह. भ. प. श्रीगुरू प्रमोद महाराज जगताप, पं. रामदास पळसुले, सूरमणी पं. विजय बक्षी, सुनील मारणे, पं. शारंगधर साठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक ह. भ. प. विजय दादा महाराज जगताप यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पंडिता पल्लवी पोटे, गोदावरी भोयर यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त पं. संजय गरुड यांचे शास्त्रीय गायन होणार असून ऋषिकेश जगताप (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. त्यानंतर पं. सत्यजित तळवलकर यांचे एकल तबला वादन होणार असून लहेरा साथ मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पुस्तकाविषयी…
‘तालचक्र’ पुस्तकात तबल्यातील घराणी, भारतीय तालवाद्ये, नामवंत वादक यांच्या माहितीबरोबरच ताल व ठेका, लय-लयकारी व जाती परस्पर संबंध, तबल्यातील मूळ परिभाषा आदींविषयी सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे. तबला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अभ्यासकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
जाहिरात