गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘वसाहतवादी मानसिकतेचे पेच समजून घेण्यासाठी लेखनाकडे वळलो’!!
प्रशासकीय अधिकारी संग्राम गायकवाड यांचे मनोगत
‘रोहन साहित्य मैफली’त संग्राम गायकवाड यांच्याशी रंगल्या गप्पा !
पुणे : ‘स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे उलटली. आपण आजही ब्रिटिशांनी आखून दिलेल्या, त्यांच्या तत्कालीन सोयीच्या प्रशासकीय व्यवस्थांचे पालन करत आहोत. आपल्या या वसाहतवादी मानसिकतेतून निर्माण झालेले पेच समजून घेण्यासाठी मी लेखनाकडे वळलो, असे मनोगत प्रसिद्ध लेखक आणि आयकर विभागातील प्रशासकीय अधिकारी संग्राम गायकवाड यांनी व्यक्त केले.
‘रोहन साहित्य मैफल या उपक्रमाअंतर्गत लेखक संग्राम गायकवाड यांच्याशी रोहन प्रकाशन आणि भावार्थतर्फे संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम भावार्थ, कर्वे रस्ता, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला होता. संग्राम गायकवाड यांच्याशी प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी संवाद साधला. गायकवाड यांनी लिहिलेल्या ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ आणि ‘मनसमझावन’ या दोन कादंबऱ्यांच्या संदर्भात हा संवाद होता.
लेखकाची जडण-घडण, त्यांच्या लेखनामागील विचार जाणून घेण्याची संधी वाचकांना ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमातून घेता यावी यासाठी संवादात्मक कार्यक्रम सुरू केल्याचे रोहन प्रकाशनचे संचालक रोहन चंपानेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
लेखनामागील प्रेरणांविषयी बोलताना गायकवाड म्हणाले, आयकर विभागात काम करताना, प्रशासकीय कामकाजाची जी ‘व्यवस्था’ मी अनुभवतो, त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न मला करावासा वाटला. कुठल्याही प्रशासकीय विभागात विशिष्ट व्यवस्था असते.
रोहन प्रकाशन आणि भावार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक आपल्या भेटीला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी दीपा देशमुख आणि संग्राम गायकवाड.
ती वर्षानुवर्षांच्या पद्धतीने रुजलेली आणि रुळलेली असते. ब्रिटिश गेले तरी आपण आजही त्यांच्याच व्यवस्थांचे पालन करतो, त्यांच्याच व्यवस्था राबवतो. यातून जे पेच प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळ्यांवर निर्माण होतात, ते लेखक म्हणून मला प्रवृत्त करतात. माझे लेखन या भूमिकेतून झाले आहे.
माझ्या मनातील आशयाच्या प्रकटीकरणासाठीची अपरिहार्यता म्हणून मी कादंबरी हा प्रकार निवडला, असे सांगून ते म्हणाले, व्यवस्था प्रशासकीय असो वा सामाजिक असो, त्याकडे पाहण्याचे विविध दृष्टीकोन असतात. काही व्यावहारिक असतात तर काही भावनिक असतात. ‘मनसमझावन’ या कादंबरीच्या माध्यमातून सामाजिक अंगाने जाणवलेले पेच मांडण्याचा प्रयत्न केला.
कबीर ग्रंथावली, रामदासकृत दखनी उर्दू पदावली आणि शाह तुराब यांचे मन समझावन, यांच्या आधाराने मी विद्यमान सामाजिक तेढ, फुटीरतावाद, ध्रुवीकरण, कट्टरता यांकडे मानवतावादी दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला आहे, असेही गायकडवाड म्हणाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित वाचकांनीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभाग घेतला. श्रद्धा मयेकर यांनी आभार मानले.
जाहिरात