गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘सुवर्णरंग’ कार्यक्रमाअंतर्गत गुरुवारी पंडित पांडुरंग मुखडे यांचा गौरव !!
सांगीतिक कादरकीर्दीला 50 वर्षे झाल्याने सोहळ्याचे आयोजन !
पंडित शौनक अभिषेकी यांच्या मैफलीचे आयोजन !!
पुणे : ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे यांच्या सांगीतिक कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुखडे परिवाराच्या वतीने ‘सुवर्णरंग’ कार्यक्रमाअंतर्गत त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम गुरुवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने पंडित शौनक अभिषेकी यांचे गायन होणार आहे, अशी माहिती महानंदा मुखडे, आदिती बोरकर, श्रद्धा मुखडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. विभागिय आयुक्त जगदीश पाटील, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पं. उदय भवाळकर, पं. उल्हास कशाळकर, विदुषी शमा भाटे, पं. अतुलकुमार उपाध्ये, निरुपणकार उल्हास पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पांडुरंग मुखडे
भरत नाट्य संशोधन मंदिराचे अभय जबडे, संजय डोळे, चारुलता पाटणकर यांचा कार्यक्रमात विशेष सहभाग असणार असून कार्यक्रमाचे निवेदन रवींद्र खरे करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पांडुरंग मुखडे यांच्याविषयी…
मुखडे यांना लहानपणापासूनच वाद्य वादनाची आवड होती. तबला वादनाचे प्राथमिक शिक्षण पं. के. एन. बोळंगे तसेच पं. भीमराव कनकधर यांच्याकडे झाले. 1973मध्ये पुण्यात आल्यानंतर वीणा भक्तिगीत मंडळात तबलासाथ करू लागले. त्यावेळी गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या घरी पंडित भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे, पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्या भेटीचा योग आला. मुखडे यांनी 1977-78 साली सवाई गंधर्व महोत्सवात डॉ. वसंतराव देशपांडे यांना तबला साथ केली आहे.
दरम्यान, मरहूम उस्ताद गुलाम रसूल खाँ यांचे गंडाबंद शागीर्द झाले. पुढे पं. जसराज, डॉ. प्रभा अत्रे, वीणा सहस्त्रबुद्धे, पं. जितेंद्र अभिषेकी, माणिक वर्मा, बसवराव राजगुरू तसेच सुप्रसिद्ध कथक नृत्यगुरू विदुषी रोहिणी भाटे यांसारख्या दिग्गजांना तबला साथ करण्याचे भाग्य लाभले आहे.
—————————————————————
जाहिरात