गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘जयोस्तुते’ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील उलगडले पैलू !!
नाट्यसंस्कार कला अकादमी निर्मित नाट्यप्रयोगाला रसिकांची पसंती !!
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, समर्पण आणि विज्ञाननिष्ठा असे विविध पैलू कलाकारांनी उलगडले ते ‘जयोस्तुते’ या दोन अंकी नाट्यकृतीतून! नाट्याला संगीत आणि नृत्याची जोड मिळाल्याने ही नाट्यकृती अधिक प्रभावी आणि नेटकी ठरली.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी ‘जयोस्तुते’ या नाटकाचा पहिला प्रयोग रसिकांच्या उदंड प्रतिसादात भरत नाट्य मंदिरात झाला. पाच ते 75 वर्षे वयोगटातील 50 कलाकारांचा यात सहभाग होता. नेत्रदीप प्रकाश योजना, समर्पक नेपथ्य तसेच दृक-श्राव्य माध्यमातून प्रसंगांची केलेली मांडणी प्रभावी ठरली. अन्वय बेंद्रे यांच्या निवेदनातून रोमांच उभे राहिले.
खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी नगरसेविका प्रा. माधुरी सहस्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार कुलकर्णी यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन प्रयोगाचा शुभारंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बालपण, पुण्यातील शिक्षण, इंग्लडमधील क्रांतिकार योजना, पारतंत्र्यात असलेल्या भारतमातेला स्वतंत्र करण्याविषयीची तळमळ, स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी असलेली आत्मियता, सुटकेसाठी समुद्रात मारलेली उडी, रत्नागिरी येथील सामाजिक कार्य, विज्ञाननिष्ठ भूमिका असे विविध पैलू ‘जयोस्तुते’ या नाट्यकृतीतून रसिकांना नव्याने अनुभवायला मिळाले. दोन-सव्वादोन तास खिळवून ठेवणाऱ्या नाट्य प्रयोगाला रसिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हे आणखी एक वैशिष्ट्य!
संकल्पना प्रकाश पारखी यांची होती तर लेखन आणि दिग्दर्शन अमोल जाधव यांचे होते. शर्व दाते, वेद दाते, मीत कुलकर्णी, प्रसन्न सोहनी, ओंकार देशपांडे, दिपाली निरगुडकर, वेद पळशीकर, वरुण समर्थ आदी प्रमुख भूमिकांमध्ये होते. पुष्कर देशपांडे, सुचित्रा मेढदकर, सुधीर फडतरे, योगेश सातपुते, प्रतिक पारखी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. पूजा पारखी, पार्थ कोकिळ व सहकार्यांची गायनसाथ लाभली.
–
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजच्या तरुणांना आणि लहान मुलांना समजावेत या उद्देशाने ‘जयोस्तुते’ या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. नाट्य, नृत्य, संगीत अशा विविध पैलूंनी साकारलेला आविष्कार म्हणजे ‘जयोस्तुते’. या नाट्यकृतीच्या निर्मिसाठी सात्यकी सावरकर आणि सावरकर कुटुंबियांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
– प्रकाश पारखी
—
‘जयोस्तुते’ ही एक अप्रतिम, अद्वितीय, अनोखी आणि संस्मरणीय नाट्यकृती पाहण्याचा योग आला. या नाट्यकृतीद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट डोळ्यापुढे उभा राहिला. नाट्यप्रयोगासाठी सुयोग्य-समर्पक कवितांची निवड करण्यात आली. कलाकारांचे गायन आणि नृत्याविष्कारही प्रभावी होता. या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत यासाठी शुभेच्छा.
राजा मोघे, प्रेक्षक
–
जाहिरात