गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वरसाधनेमध्ये समर्पणाचा भाव आवश्यक : स्वरतज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई !!
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे गायक, कलाकार, निवेदक, व्याख्याते यांच्यासाठी कार्यशाळा !
पुणे : स्वरसाधना ही केवळ सराव करण्याची गोष्ट नसून स्वरसाधनेत परमेश्वराशी तादात्म्य साधण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे स्वरसाधना करताना भक्तीभाव आणि समर्पणाची भावना ठेवल्यास त्याचे परिणाम सकारात्मक दिसतात. रियाज करताना, आवाजाची काळजी घेताना काय करावे याच्यापेक्षा काय करू नये या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन गायत्री मंत्र, ओंकार साधना आणि स्वरसाधना या विषयाचे अभ्यासक सुप्रसिद्ध स्वरतज्ज्ञ डॉ. मिलिंद भोई यांनी केले.
कलाकारांचे माहेरघर असलेल्या पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या वतीने गायक, कलाकार, निवेदक, व्याख्याते, कीर्तनकार, शिक्षक यांच्यासाठी आवाजाची काळजी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. भोई बोलत होते. पंडित विकास कशाळकर, पंडित सुहास व्यास, पंडित हेमंत पेंडसे, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित संजीव मेहेंदळे, विदुषी मंजुषा पाटील, अपर्णा संत, गजल गायक अली हुसेन, इकबाल दरबार, जितेंद्र भुरूक, नीरजा आपटे, प्रग्या गौरकर आदी उपस्थित होते. पूना गेस्ट हाऊस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने स्वरसाधनेमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या आयुर्वेदोक्त वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
आवाजाची काळजी, रियाज, आहार-विहार, सवयी, व्यसने या विषयी स्लाईड शोच्या माध्यमातून डॉ. मिलिंद भोई यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, हरिहरन, सुरेश वाडकर, पंडित अजय चक्रवर्ती, कौशिकी चक्रवर्ती, वैशाली सामंत, संगीतकार प्यारेलालजी, संगीतकार आनंदजी, पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आदी मान्यवर दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते.
पंडित सुहास व्यास यांनी मार्गदर्शन करताना स्वरसाधना हा समर्पणाचा विषय असून रियाज आणि आवाजाची काळजी या दोन्ही गोष्टी एकत्रित अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचने गायकांसाठी उपयुक्त क्षेत्रात पदार्पण केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. या उपक्रमाची व्याप्ती वाढवावी अशी सूचनाही केली.
कार्यक्रमाचे संयोजक पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. गायक, निवेदक, अभिनेते यांच्या आवाजाच्या काळजीसाठी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आणि व्यापक स्वरूपात आयोजित करू अशी ग्वाही त्यांनी दिली. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे समन्वयक अजित कुमठेकर यांनी संयोजन तर सुप्रिया गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले.
जाहिरात