गोल्डन आय न्यूज नेटवर्क
उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टचा 7 जुलैला वर्षपूर्ती आनंदोत्सव-सन्मान समारोह
कविवर्य बाकीबाबांच्या काव्यरसग्रहणाचा ‘घन वरसे रे!’ कार्यक्रम !
एअर मार्शल प्रदीप बापट, चित्रकार वासुदेव कामत, नाट्य कलावंत अपर्णा चोथे यांचा होणार गौरव !
पुणे : उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट संस्थेच्या 29व्या वर्षपूर्ती आनंदोत्सवाचे रविवार, दि. 7 जुलै रोजी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप पद्माकर बापट यांना राष्ट्राच्या संरक्षणविषयक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल स्व. विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवनसाफल्य सन्मान, विश्वविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांना स्व. श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग जीवनगुणगौरव सन्मान, तसेच ‘त्या तिघी’ या एकपात्री नाटकाच्या माध्यमातून केलेल्या राष्ट्र कार्यासाठी अपर्णा चोथे या नाट्यकलावतीस स्वा. सावरकर उत्तुंग राष्ट्रविचार सन्मानाने गौरविले जाणार आहे.
संगीत, नाट्य, नृत्य, गायन, वादन, लेखन, कीर्तन, प्रवचन, विचारमंथन अशा विविध ललित कलांच्या माध्यमातून संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधनाच्या उद्दिष्टाने 1994 पासून उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट मुंबई-पुणे-ठाणे येथे कार्यरत आहे. संस्थेच्या 29व्या वर्षपूर्ती आनंदोत्सवानिमित्त आयोजिलेला कार्यक्रम रविवार, दि. 7 जुलै 2024 सायंकाळी 5:30 वाजता मयूर कॉलनीतील एम. ई. एस. (बालशिक्षण मंदिर इंग्रजी प्रशाला) सभागृहात होणार आहे,
अशी माहिती संस्थेचे संचालक ओंकार खाडिलकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
भारतीय संस्कृती, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक, राष्ट्रभक्त, विद्यावाचस्पती डॉ. शंकरराव अभ्यंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असणार आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून उत्तरार्धात कविकुलगुरू कालिदास जयंती आणि कविवर्य पद्मश्री बा. भ. बोरकर स्मृतिदिनानिमित्त ‘घन वरसे रे!’ या बोरकर यांच्या काव्यरसग्रहणाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे.
बोरकर यांचे पुतणे आणि कवी डॉ. घन:श्याम बोरकर यांची प्रस्तुती आहे.कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका सभागृहस्थळी एक तास आधी उपलब्ध असणार आहेत. अधिक माहितीसाठी उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टच्या फेसबुक पेजला भेट देता येईल.
—————––—––————————————-
जाहिरात