गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित सी. आर. व्यास स्मृती संगीत समारोहात डॉ. श्याम गुंडावार, विदुषी शोभा चौधरी यांचे गायन !
पुणे : पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांची जन्मशताब्दी आणि पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानच्या शुभारंभानिमित्त पंडित सी. आर. व्यास यांचे शिष्य डॉ. श्याम गुंडावार आणि विदुषी शोभा चौधरी यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित संगीत समारोह गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी डॉ. विकास कशाळकर, पातंजली मादुस्कर, पंडित प्रमोद मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारोहात पंडित सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य पंडित सुहास व्यास यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. या वेळी अनुराधा व्यास उपस्थित होत्या.
डॉ. श्याम गुंडावार यांनी मैफलीची सुरुवात मधुवंती रागातील ‘झनन झन बाजे पायल’ या बंदिशीने केली.
पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित पंडित सी. आर. व्यास स्मृती संगीत समारोहात पंडित सुभाष कामत, डॉ. श्याम गुंडावार, पंडित प्रमोद मराठे.
याला जोडून त्यांनी प्रभावीपणे तराणा सादर केला.
त्यानंतर विदुषी शोभा चौधरी यांचे बहारदार गायन झाले. त्यांनी अनवट अशा धनकोनी कल्याण रागातील ‘सरस सूर गाऊ’ ही चीज सादर केली. द्रुत लयीत ‘देख चंदा नभ निकस आयो’ ही चीज प्रभावीपणे सादर करून रसिकांची मने जिंकली. मैफलीची सांगता पंडित रामाश्रय झा रचित ‘हे मन कल्याण’ या रागमालेने केली. कलाकारांना पंडित प्रमोद मराठे (संवादिनी), पंडित सुभाष कामत (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.
डॉ. श्याम गुंडावार यांनी मनोगत व्यक्त करताना संस्था स्थापनेमागील भूमिका विशद केली. आपल्या सांगीतिक कारकीर्दीत लाभलेल्या पाच गुरुंविषयी कृतज्ञता म्हणून पंचामृत कला प्रतिष्ठानची स्थापना केल्याचे सांगितले.
पंचामृत संगीत कला प्रतिष्ठान व गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित पंडित सी. आर. व्यास स्मृती संगीत समारोहात पंडित सुभाष कामत, विदुषी शोभा चौधरी, पंडित प्रमोद मराठे.
पंडित सी. आर. व्यास सहृदयी कलाकार : डॉ. विकास कशाळकर
या वेळी पंडित सी. आर. व्यास यांच्या विषयी बोलताना डॉ. विकास कशाळकर म्हणाले, पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास हे सहृदयी कलाकार होते. ते कधीच व्यावसायिक कलाकार बनले नाहीत. त्यांनी कायमच उत्तम विद्यार्थी व श्रोते घडविले. त्यामुळे देशाच्या विविध प्रांतात त्यांचे अनेक उत्तम शिष्य आढळतात. पंडित सी. आर. व्यास यांच्याकडे बंदिशीचा अमाप साठा होता. अगदी अनवट रागातील अनेक ख्याल त्यांच्यापाशी होते. अतिशय गोड आवाज हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य असल्याने ते हृदयाला भिडत असे. पंडितजी कलेशी प्रामाणिक होते. त्यांनी कायम इतर कलाकारांचे गाणे ऐकून कौतुकही केले.
रागामागील गायकी समजणे अवघड : पंडित सुहास व्याससत्काराला उत्तर देताना पंडित सुहास व्यास म्हणाले, या सत्कारामागील भावनेत गुरूंविषयी आदर-प्रेम तर जाणवतेच तसेच गुरूंच्या पुढील पिढ्यांनाही मान देण्याचे संस्कार दिसतात. मी सांगीतिक कुटुंबात जन्माला आल्यामुळे पहिल्या पासूनच संगीतावर प्रेम करतो व आजही करत आहे. रागामागील गायकी समजणे अवघड असते आणि जेव्हा ती समजायला लागते तेव्हा कलाकाराची शारीरिक ताकद कमी झालेली असते.
कलाकाराने इतर कलाकारांचे गाणे ऐकले पाहिजे ही वडिलांनी दिलेली शिकवण मी आजही सांभाळत आहे, कारण एका कलाकाराने दिलेली दाद ही अनेक श्रोत्यांनी दाद देण्यापेक्षीही श्रेष्ठ असते. पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानच्या शुभारंभानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पंडित सुहास व्यास यांच्याविषयी बोलताना पातंजली मादुस्कर म्हणाले, सुहासजींनी वडिलांची विद्या प्राणपणाने जोपासली तसेच त्यात भर घालायचाही प्रयत्न केला. त्यांच्या संगीताच्या व्यासंगामुळे ते आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी पंचामृत कला प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचा सत्कार डॉ. श्याम गुंडावार, अलका गुंडावार, देवानंद पद्मावार, डॉ. ललित कोसे, मुकुंद द्रविड, पंडित शैलेश भागवत, राजेश पद्मावार, डॉ. अविनाश जोशी यांनी केला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी तर सूत्रसंचालन मकरंद वळे यांनी केले.
जाहिरात