गोल्डन आय न्यूज नेटवर्क
माझा गौरव हा रसिकांचाच गौरव
पं. उपेंद्र भट यांचे भावपूर्ण मनोगत !!
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुपतर्फे उपेंद्र भट यांचा अमृत महोत्सवी गौरव !
पुणे : मी पुण्यात आलो, तेव्हा माझ्याकडे गाण्याशिवाय काही नव्हते. माझे गुरू पं. भीमसेन जोशी यांनी मला एकच सल्ला दिला गाणं उत्तम करा, लोक तुम्हाला काही कमी पडू देणार नाहीत. गुरुजींचे हे शब्द हाच मला मिळालेला आशीर्वाद होता, तो सदैव खरा ठरला. माझा गौरव हा माझा नसून, पुणेकर रसिकांचा गौरव आहे. रसिकांनी मला स्वीकारले, मी त्यांचा चिरऋणी आहे, असे भावनोत्कट उद्गार ज्येष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांनी शनिवारी येथे काढले.
संवाद, पुणे व कोहिनूर ग्रुप आयोजित अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात शौनक अभिषेकी, निकिता मोघे, सुनील महाजन, उषा मंगेशकर, पंडित उपेंद्र भट, कृष्णकुमार गोयल, श्रीनिवास जोशी, केतकी महाजन-बोरकर
संवाद, पुणे व कोहिनूर ग्रुपतर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित उपेंद्र भट यांच्या अमृत महोत्सवी गौरव समारंभाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंडित भट यांचा गौरव प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते झाला.
कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, पंडित शौनक अभिषेकी, संवाद, पुणेचे सुनील महाजन आणि निकिता मोघे यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले.
सत्कारानंतर मनोगत मांडताना पं. भट यांना गहिवरून आले. मंगळूरसारख्या छोट्या गावातून फक्त गाण्याचा ध्यास घेऊन मी पुण्यात आलो. पं. भीमसेनजींनी मला शिष्य म्हणून घडवले, शिकवले. मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य होऊन गेलो. मला त्यांनी जिव्हाळा, आपुलकी दिली. कन्नड गीतरामायण गायनाच्या निमित्ताने गुरुंची भेट घडली आणि आयुष्याची दिशा बदलली. अनेक संघर्षाचे, दुःखाचे, वेदनांचे क्षण आयुष्यात आले. अगदी आत्महत्येचाही विचार आला. पुत्रवियोगाचे दुःख सोसले. माझ्यासाठी माझ्या पत्नीने अतोनात कष्ट घेतले. माझ्यासह सारे कुटुंब सांभाळले. मी साऱ्यांचा सदैव ऋणी आहे, अशा भावपूर्ण शब्दांत पं. भट यांनी भावना व्यक्त केल्या.
मंगेशकर म्हणाल्या, राज्य सरकारतर्फे सुरू केलेल्या लता मंगेशकर संगीत अकादमीचे प्राचार्य म्हणून पं. उपेंद्र भट उत्तम जबाबदारी सांभाळतील, याचा विश्वास आहे. ते पं. भीमसेनजींचे शिष्य आहेत, हे त्यांच्या गायनाची झलक ऐकूनही लक्षात येते. त्यांच्या मार्गदर्शनाने अकादमीत उत्तम विद्यार्थी घडतील, असा मंगेशकर कुटुंबियांचा विश्वास आहे.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, देशविदेशात किराणा घराण्याचे सूर पोचवण्यात पं. भट यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सांगीतिक वाटचालीत मराठी आणि कन्नड संस्कृतींचा मिलाफ आहे. त्यांच्या रूपाने युवा कलाकारांसमोर एक आदर्श उभा आहे.
पं. श्रीनिवास जोशी म्हणाले, पं. भट हे जोशी कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचे गायन छाप पाडणारे आहे. ते मधुकर वृत्तीने जिथे शिकता येईल, तिथून शिकत असतात. संगीताच्या सर्व प्रकारांवर त्यांचे मनापासून प्रेम आहे.
पं. भट यांनी भीमसेनजींच्या गायकीची भक्ती उपासना केली आहे, अशा शब्दात शौनक अभिषेकी यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. निकिता मोघे यांनी आभार मानले. गीता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धात भक्तिरचनांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनमोल थत्ते, धनंजय भाटे, देवव्रत भातखंडे, विराज जोशी, श्रीनिवास जोशी, शौनक अभिषेकी आणि पंडित उपेंद्र भट यांचा सहभाग होता. इंद्रायणीकाठी, माझे जीवनगाणे, दान करी रे.., कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आता कोठे धावे मन, जाता पंढरीसी सुख वाटे जिवा, आधी रचिली पंढरी.. मग वैकुंठनगरी, याचसाठी केला होता अट्टहास, सौभाग्यदा लक्ष्मी, जो भजे हरिको सदा.. अशा रचना कलाकारांनी सादर केल्या.
जाहिरात